खेडमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण,आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 06:10 PM2019-01-19T18:10:15+5:302019-01-19T18:11:45+5:30
खेड तालुक्यातील ज्ञानदीप माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील इयत्ता बारावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी खेड पोलीस स्थानकात दिली आहे. खेड पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
खेड :तालुक्यातील ज्ञानदीप माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील इयत्ता बारावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी खेड पोलीस स्थानकात दिली आहे. खेड पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
हृतिक मोहन गोलामडे (१७) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील मोहन गोलामडे (रा. शंकरवाडी, चिपळूण) यांनी खेड पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. हृतिक हा मूळचा चिपळूण येथील असून, शिक्षणानिमित्त तो खेड तालुक्यातील खोंडे येथील ज्ञानदीप माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत शिकत होता.
तो त्याच गावात भाड्याने खोली घेऊन राहत होता. गुरुवार दिनांक १७ जानेवारी पासून तो शाळेत आणि त्याच्या खोलीत आणि गावात देखील निदर्शनास आला नाही.
त्याच्या वडिलांनी आणि त्याच्या मित्रांनी सगळीकडे शोध घेतला. मात्र तो न सापडल्याने त्याचे वडील मोहन गोलामडे यांनी खेड पोलीस स्थानकात कोणीतरी आपल्या मुलाला फूस लावून त्याचे अपहरण केल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार खेड पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड विधान कलम ३६३ अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल गंभीर करत आहेत.