खडपोलीत दुचाकी धडकेत एक ठार
By admin | Published: February 20, 2015 11:20 PM2015-02-20T23:20:20+5:302015-02-20T23:31:03+5:30
एकाची प्रकृती गंभीर : दोन दुचाकी समोरासमोर आदळल्या
शिरगाव : चिपळूण तालुक्यातील गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीत एका केमिकल कंपनीसमोर दोन दुचाकीस्वार समोरासमोर एकमेकांवर जोराने आदळून ५२ वर्षीय प्रौढ ठार झाला, तर दुसऱ्या गाडीवरील स्वार गंभीर जखमी झाला आहे. गंगाराम जोशी असे ठार मृताचे नाव आहे. हा अपघात शुक्रवारी दुपारी २.३० वाजता झाला.
राजेश हरिश्चंद्र आंबेडे (रा. वालोटी) हा आपली दुचाकी (एमएच-०८/वाय ६७७१) घेऊन आकले गावाकडे जात होता. गंगाराम कृष्णा जोशी (५२, रा.आकले धामणखोरी सध्या खेर्डी) हे आपली दुचाकी (एमएच-०८/व्ही ७६६३) घेऊन चिपळूणहून आपल्या गावाकडे जात होते. कृष्णा केमिकलसमोर दोघेही एकमेकांवर जोरात आदळले व खाली पडले. दोघांनाही तातडीने दादर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, गंगाराम जोशी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अन्यत्र हलविण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. त्यांना हलवण्यात येत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
जोशी रक्तबंबाळ स्थितीत बेशुद्धावस्थेत पडले होते, तेव्हा त्यांना वेळेत मदत मिळू शकली नाही. खडपोली दूरक्षेत्राचे हवालदार राजेंद्र देसाई घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी खासगी प्रवासी वाहनाच्या मदतीने जोशींना दादर प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. आंबेडे याच्यावरही उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत शिरगाव पोलीस ठाण्यात झाली नव्हती. घटनास्थळी खडपोली दूरक्षेत्राचे हवालदार राजेंद्र देसाई व प्रकाश शिंदे दाखल झाले होते. त्यांनी पंचनामा केला. मृत जोशी खेर्डी येथील थ्री एम पेपर मिल या कंपनीत कामाला होते. ते आपल्या घरी आकले येथे जात असताना हा अपघात झाला. (वार्ताहर)