Ratnagiri- फासकीत अडकून बिबटयाचा मृत्यू, गुरख्यांनी परस्पर लावली विल्हेवाट; तब्बल पंधरा दिवसांनी उघडकीस आला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 12:17 PM2023-04-03T12:17:37+5:302023-04-03T12:26:42+5:30
वनविभागाने दोघा गुरख्यांना घेतले ताब्यात
विनोद पवार
राजापूर : तालुक्यातील खरवते गावात आंबा बागेत लावलेल्या फासकीत अडकून मृत्युमुखी पडलेल्या बिबटयाची बागेत काम करणाऱ्या दोन गुरख्यांनी खड्डयात पुरून परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार पुढे आला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली. वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत या प्रकाराची चौकशी सुरू केली असून दोघा गुरख्यांना ताब्यात घेतले आहे. खरवते हेदाडवाडी येथे हा प्रकार घडला असून सुमारे 15 दिवसापुर्वी या बिबटयाचा मृत्यु झालेला असावा अशी माहिती रत्नागिरीचे परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांनी दिली.
राजेश पुरण चौधरी व जगतराम चौधरी (रा. तिकापूर जि. कैलाली (नेपाळ) या दोघा गुरख्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर वन्य जीव संरक्षण कायदा 1972 चे कलम 9, 39, 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे बागांमध्ये फासक्या लावून वन्य प्राण्यांचे जीव घेण्याचे प्रकार निंदनिय असल्याच्या संतप्त प्रतिक्रीया तालुक्यात उमटत असून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
याबाबत माहिती अशी की, मौजे खरवते येथे नितीन व सुनील पद्माकर कुलकर्णी यांच्या मालकी गट नंबर १६/ आंबा बाग तुषार व तुळशीदास तात्या सोरप यांना करार तत्वावर दिली आहे. सोरप यांनी बाग राखणीकरता राजेश चौधरी व जगतराम चौधरी यांना ठेवले होते. बागेत साधारण पंधरा दिवसापूर्वी फासकिमध्ये अडकुन बिबट्या मृत झाला होता. कामगार राजेश चौधरी व जगतराम चौधरी यांनी या मृत बिबट्यास खड्डा काढून पुरले व त्याची परस्पर विल्हेवाट लावली.
याबाबत राजापूरचे वनपाल सदानंद घाडगे यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता ही घटना उघडकीस आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी खड्डातून मृत बिबट्याला बाहेर काढून अवशेष ताब्यात घेत पशुसंवर्धन अधिकारी लांजा यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याची तपासणी करुन ताब्यात घेतले. 15 दिवस उलटून गेल्याने तो पुर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी कामगार राजेश चौधरी व जगतराम चौधरी या दोघा गुरख्यांना वन्य जीव संरक्षण कायदा 1972 चे कलम 9, 39, 51 अन्वये गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले.
विभागीय वनाधिकारी दिपक खाडे व सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, राजापूरचे वनपाल सदानंद घाडगे, वनरक्षक सुरज तेली, खरवते पोलिस पाटील सचिन सिताराम मांडवकर यांनी केली. पुढील तपास वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार करीत आहेत. अशा प्रकारे वन्यजीव अडचणीमध्ये सापडल्यास वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क करणे बाबत आवाहन वन विभागा मार्फत करण्यात आले.