किंजळे गाव आजही विजेविना
By admin | Published: April 14, 2016 09:43 PM2016-04-14T21:43:26+5:302016-04-14T21:43:26+5:30
बुडीत क्षेत्र : लोकवस्ती नाही; जिल्ह्यात १५३९ गावांमध्ये पोहोचली वीज
रत्नागिरी : जिल्ह्यातील विद्युत विस्तार झपाट्याने वाढला आहे. जिल्ह्यात एकूण १५३९ गावांमध्ये शंभर टक्के विद्युतीकरण झाले असून, ४४ उपकेंद्रांतून वीजपुरवठा केला जात आहे. त्यामध्ये बुडीत क्षेत्रात मोडत असलेल्या किंजळे गावी वस्ती नसल्याने तेथे अद्याप वीज पोहोचली नसल्याची माहिती महावितरणांच्या सुत्रांनी दिली.
जिल्ह्यात महावितरण कंपनीचे सुमारे ५ लाख ग्राहक आहेत. महिन्याला वीजग्राहकांत सरासरी दोन हजारची वाढ होते. त्यांना तत्पर सुविधा देण्याचे काम महावितरण करत आहे. गेल्या काही वर्षांपासून विद्युत जाळे झपाट्याने वाढत जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात १०० टक्के विद्युतीकरण झाले असल्याचे आहे.
जिल्ह्यात एकूण १५३९ गावे असून, गावोगावी वीज पोहोचली आहे. खेड्यापाड्यात वीज पोहोचल्याने उद्योगधंद्याला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. रत्नागिरी तालुक्याला ११ उपकेद्रांतून वीज पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात ३३ केव्हीचे ९८४ किलोमीटरचे जाळे पसरलेले आहे, ११ केव्हीची ५ हजार ४६८ किलोमीटरची लाईन आहे, तर लघुदाब वाहिनीचे सुमारे ९ हजार २८३ किलोमीटरचे जाळे पसरले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील किजळे हे गाव गडनदी प्रकल्पात बुडीत क्षेत्रात असल्याने या गावातील राहणाऱ्या लोकांनी स्थलांतर केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील १५३९ गावांमध्ये विद्युतीकरण झाले. परंतु वस्तीअभावी किंजळे गावी अद्याप वीज पोहोचली नाही. रत्नागिरीमध्ये ११ उपकेंद्र, संगमेश्वर ४, राजापूर ५, लांजा ३, चिपळूण ७, गुहागर ३, खेड ४, दापोली ५ व मंडणगड येथे २ अशी मिळून रत्नागिरी जिल्ह्यात ४४ उपकेंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात अखंडपणे वीजपुरवठा सुरू असल्याची माहिती महावितरणाच्या सुत्रांनी दिली. (वार्ताहर)
ग्रामीण भागात जाळे : तब्बल ४४ उपकेंद्रातून वीजपुरवठा
जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत विजेचे जाळे पोहोचलेले आहे. तब्बल ४४ उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जात असून, महावितरणकडून अखंडपणे हा वीजपुरवठा केला जात आहे.
शेतकऱ्यांना शेतीपंप
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या सात वर्षात सुमारे ३ हजार ५९६ शेतीपंप वीजजोडण्या मंजूर करण्यात आल्या असून, वर्षाला सरासरी ५०० शेतकऱ्यांना शेतीपंप वीज जोडण्यात देण्यात आल्या असल्याची माहिती महावितरणाच्या सुत्रांनी दिली.