किरण सामंत यांनी घेतला उमेदवारी अर्ज, महायुतीत जागेवरुन तिढा

By मनोज मुळ्ये | Published: April 15, 2024 01:11 PM2024-04-15T13:11:50+5:302024-04-15T13:13:43+5:30

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीतून कोण लढवणार  

Kiran Samant, an aspiring candidate of Shindesena, filed his nomination form from Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha constituency | किरण सामंत यांनी घेतला उमेदवारी अर्ज, महायुतीत जागेवरुन तिढा

किरण सामंत यांनी घेतला उमेदवारी अर्ज, महायुतीत जागेवरुन तिढा

रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील उमेदवारी अजून कोणत्या पक्षाला जाणार, हे निश्चित झाले नसले तरी शिंदेसेनेतील इच्छुक उमेदवार किरण सामंत यांच्यावतीने आज सोमवारी उमेदवारी अर्ज घेण्यात आला. एका बाजूला या जागेसाठी भाजपचा आग्रह असताना आणि भाजपकडून जोरदार प्रचार मोहीम राबवली जात असताना शिंदेसेनेच्या उमेदवाराने अर्ज घेणे हे खळबळ उडवून देणारे ठरत आहे.

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात अनेक दिवस केवळ चर्चा सुरू आहेत. या मतदारसंघात महायुतीकडून निवडणूक कोण लढवणार, हे अजूनही निश्चित झालेले नाही. भाजप या जागेसाठी टोकाचा आग्रह धरून आहे. त्याचवेळी शिंदेसेनेनेही हा मतदारसंघ आपल्यालाच मिळावा, यासाठी आग्रही आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप तर रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे सेना प्रबळ आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे दावे वरिष्ठांकडून कायम ठेवण्यात आले आहेत. गेले अनेक दिवस अनेक मुहूर्त चर्चेत आले, मात्र ही जागा कोण लढवणार हे निश्चित झालेले नाही.

कल्याण मतदारसंघ महायुतीमध्ये शिंदेसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाईल, असा अंदाज राजकीय पातळीवर बांधण्यात आला होता. या मतदारसंघातील उमेदवार कमळ या चिन्हावरच लढेल असे भाजपच्या गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या सर्वच नेत्यांकडून वारंवार ठासून सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेचा दावाही तेवढाच प्रबळ आहे. हा मतदारसंघ पारंपरिक दृष्ट्या शिवसेनेचा असल्याने येथे धनुष्यबाण या चिन्हावरच निवडणूक लढवण्यासाठी शिंदेसेना आग्रही आहे. त्यामुळे अजून कोणताही तोडगा निघालेला नाही.

एका बाजूला भाजपकडून जोरदार प्रचार सुरू असताना दुसऱ्या बाजूला शिंदे सेनेचे इच्छुक उमेदवार किरण सामंत यांच्यावतीने जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी हा उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील रंगत अधिक वाढणार आहे. घेतलेला अर्ज ते भरणार का? त्यांना उमेदवारी मिळणार का? उमेदवारी न मिळाल्यास ते अपक्ष लढणार का? हे दबावतंत्र आहे का, असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत.

Web Title: Kiran Samant, an aspiring candidate of Shindesena, filed his nomination form from Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.