किरण सामंत यांचा रोख कोणावर?, स्टेटसवर ठेवलेल्या 'मशाल' चिन्हामुळे राजकीय चर्चेंना उधाण
By मनोज मुळ्ये | Published: September 29, 2023 05:37 PM2023-09-29T17:37:17+5:302023-09-29T17:37:56+5:30
‘जो होगा वो देखा जाएगा’ अशी टॅगलाईनही
रत्नागिरी : प्रसिद्ध उद्योजक आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी त्यांच्या व्हॉटस्ॲप डीपीला (डिस्प्ले पिक्चर) मशालीचे चित्र ठेवल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघासाठी संभाव्य नाव म्हणून चर्चेत असलेल्या किरण सामंत यांचा रोख आमदार नितेश राणे यांच्यावर असल्याचे वरकरणी दिसत असले तरी त्यांचा रोख ‘नेहमी खरं बोलतो’ असे म्हणणाऱ्या राजकीय नेत्यावर असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेवरुन स्पष्ट होत आहे.
रत्नागिरी लोकसभा मतदार संघासाठी शिवसेनेकडून किरण सामंत यांचे नाव पुढे येत आहे. आमदार नितेश राणे यांनी वेगळी भूमिका मांडली. हा मतदार संघ भाजपचा आहे आणि जर किरण सामंत यांना निवडणूक लढवायची असेल तर त्यांना भाजपमध्ये यावे लागेल, असे आमदार राणे म्हणाले.
या एकूणच राजकीय पार्श्वभूमीवर शुक्रवारी उद्योजक किरण सामंत यांचे व्हॉटस्ॲप डीपी चर्चेचे झाले. त्यांनी आपल्या डीपीला मशालीचे चित्र ठेवले. ‘जो होगा वो देखा जाएगा’ अशी टॅगलाईनही होती. त्यामुळे लगेचच त्यावर चर्चा सुरू झाली. काही वेळातच त्यांनी डीपी बदलले. अलिकडेच नितेश राणे यांनी लोकसभा उमेदवारीवरुन जे विधान केले, त्याला उद्देशून त्यांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा सुरू झाली. मात्र ज्यावेळी किरण सामंत यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली, तेव्हा त्यांच्या बोलण्याचा रोख कोकणावर नसून, पुणेकरांवर असल्याचे स्पष्ट झाले.
जे कोण स्पष्ट बोलण्याचा, खरं बोलण्याचा आव आणतात, जे स्वत:चं झाकून ठेवतात आणि दुसऱ्याचे वाकून पाहतात, त्यांच्या नोबॉलवर फ्री हीट देणार, असे किरण सामंत यांनी सांगितले. खरं बोलणारे पुणेकर नेते त्यांच्या ‘टार्गेट’वर असल्याचे स्पष्ट होत आहे. खरं बोलणारे नेते सध्या सर्वच विभागात अधिक लक्ष देत असल्याने हा रोख त्यांच्यावरच असल्याचे स्पष्ट आहे.