Kirit Somaiya: ‘बेचेनवाला-खरीदनेवाला शिवसेना’, किरीट साेमय्यांच्या नव्या ट्विटमुळे खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 01:46 PM2022-03-28T13:46:42+5:302022-03-28T13:52:04+5:30
‘दापाेलीची कमाई बेचनेवाला शिवसेना, खरीदनेवाला शिवसेना’ असे म्हणत शिवसेनेचे नेते व मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांना दापोलीचे शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी जमीन विकल्याचा आराेप किरीट साेमय्या यांनी या ट्विटमध्ये केला आहे.
रत्नागिरी : दापाेली तालुक्यातील मुरुड येथील राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसाॅर्ट ताेडण्यासाठी आलेल्या भाजप नेते किरीट साेमय्या यांच्या नव्या ट्विटमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. किरीट साेमय्या यांनी ‘बेचेनवाला शिवसेना, खरीदनेवाला शिवसेना’ असे म्हणत शिवसेनेचे दापाेलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावर निशाणा साधला आहे. एका जमीन व्यवहाराची चाैकशी करण्याची मागणी किरीट साेमय्या यांनी केली आहे.
मुरुड येथील रिसाॅर्ट अनधिकृत असल्याचा आराेप भाजप नेते किरीट साेमय्या यांनी केला आहे. हे रिसाॅर्ट अद्याप पाडण्यात न आल्याने २६ मार्च राेजी किरीट साेमय्या चक्क प्रतिकात्मक हाताेडा घेऊन दापाेलीत आले हाेते. मात्र, पाेलिसांनी अटकाव केल्याने त्यांना रिसाॅर्टपर्यंत पाेहाेचता आले नाही. रात्री उशिराने किरीट साेमय्या यांना जिल्ह्याबाहेर नेत मुंबईच्या दिशेने पाठविण्यात आले.
त्यानंतर लगेच किरीट साेमय्या यांनी रविवारी आणखी एक ट्विट करुन शिवसेनेच्या माजी आमदारावर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सूर्यकांत दळवी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. ‘दापाेलीची कमाई बेचनेवाला शिवसेना, खरीदनेवाला शिवसेना’ असे म्हणत शिवसेनेचे नेते व मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांना दापोलीचे शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी जमीन विकल्याचा आराेप किरीट साेमय्या यांनी या ट्विटमध्ये केला आहे. त्याचा सातबाराही त्यांनी जोडला आहे.
ही जमीन ६२,३०० स्क्वेअर फूट इतकी आहे. एनए व्यावसायिक असणारी ही जमीम १० कोटी पेक्षा जास्त बाजार मूल्याने विकत घेतल्याचे किरीट साेमय्या यांनी म्हटले आहे. एवढेच नव्हे तर बँक ऑफ इंडियाने या जमिनीवर ४.१२ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते, असाही उल्लेख किरीट साेमय्या यांनी केला आहे.