Kirit Somaiya in Dapoli: सोमय्या येताच दापोलीत जमावबंदी लागू, पोलीस स्थानकातच निलेश राणेंचा राडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 06:47 PM2022-03-26T18:47:06+5:302022-03-26T19:03:10+5:30
साेमय्या दापाेलीत दाखल हाेताच राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवत घाेषणाबाजी केली. तर किरीट साेमय्या यांच्याविराेधात आंदाेलन केले. दरम्यान, दापाेलीतील वातावरण तणावपूर्ण हाेण्याची चिन्ह पाहून प्रशासनाने १४४ कलमान्वये मनाई आदेश जारी केला.
दापोली : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्ट पाडण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या शनिवारी (२६ मार्च) दापोलीत आले आहेत. किरीट साेमय्या जिल्ह्यात दाखल होताच पाेलिसांनी १४४ कलम लागू करत मनाई आदेश जाहीर केला आहे. या आदेशानंतर दापाेली पाेलीस स्थानकात काेणाला साेडायचे यावरुन जाेरदार राडा झाला. निलेश राणे यांनी आक्रमक हाेत पाेलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे मुरुड येथील रिसाॅर्ट अनधिकृत असल्याचा आराेप भाजप नेते किरीट साेमय्या यांनी केला आहे. याबाबत त्यांनी केंद्रापर्यंत तक्रार अर्ज दाखल करुन बांधकाम पाडण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्यापही हे बांधकाम पाडण्यात आलेले नाही. बांधकाम पाडण्याबाबतची कार्यवाही काेठेपर्यंत आली आहे, हे पाहण्यासाठी किरीट साेमय्या २६ मार्च राेजी दापाेलीत आले आहेत.
साेमय्या यांच्या या दाैऱ्याला राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विराेध केला आहे. तर स्थानिक हाॅटेल व्यावसायिकांनीही विराेधाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे दापाेलीत कडेकाेट पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला आहे. किरीट साेमय्या यांच्या दाैऱ्यात माजी खासदार निलेश राणेही सहभागी झाले असून, त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिआव्हान दिले आहे.
साेमय्या दापाेलीत दाखल हाेताच राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवत घाेषणाबाजी केली. तर किरीट साेमय्या यांच्याविराेधात आंदाेलन केले. दरम्यान, दापाेलीतील वातावरण तणावपूर्ण हाेण्याची चिन्ह पाहून प्रशासनाने १४४ कलमान्वये मनाई आदेश जारी केला. मनाई आदेश जारी झाल्यानंतर किरीट साेमय्या, निलेश राणे बैठकीसाठी दापाेली पाेलीस स्थानकात दाखल झाले हाेते.
यावेळी मनाई आदेशाची प्रत त्यांच्या हाती देत सर्वांना पाेलीस स्थानकात येण्यास मज्जाव केला. पाेलीस स्थानकात काेणाला साेडायचे यावरुन स्थानकाबाहेरच राडा झाला. त्यावरुन निलेश राणे आक्रमक झाले. त्यांनी ‘माझ्या अंगाला हात का लावलात,’ असा प्रश्न पाेलिसांना विचारला. त्यानंतर पाेलीस स्थानकाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली हाेती.