Kirit Somaiya: वादग्रस्त 'साई रिसॉर्ट' पाडण्याचे आदेश, किरीट सोमय्या मुरुडकडे रवाना, रिसॉर्ट परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 12:52 PM2022-08-27T12:52:51+5:302022-08-27T13:06:47+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते अनिल परब यांचे कथित रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून समुद्रकिनाऱ्यावर हे साई रिसॉर्ट बांधण्यात आले आहे.
शिवाजी गोरे
दापोली: रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील वादग्रस्त 'साई रिसॉर्ट' वर प्रतिकात्मक हातोडा मारण्यासाठी भाजपा नेते, माजी खासदार किरीट सोमय्या मुरुड येथे दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर रिसॉर्ट परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
राज्यात सत्तांत्तर होताच साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिल्यानंतर हालचालीला वेग आला आहे. आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराचे स्मारक पाडूया अशा प्रकारचे सूचक वक्तव्य करत किरीट सोमय्या मुंबईतून निघाले आहेत. अवघ्या काही तासातच ते मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावरती दाखल होतील. मात्र या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्ण खबरदारी पोलिसांनी घेतली आहे.
दरम्यान या रिसॉर्ट मधील साहित्याची हलवा हलव केल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते अनिल परब यांचे कथित रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून समुद्रकिनाऱ्यावर हे साई रिसॉर्ट बांधण्यात आले आहे. ते पाडण्याचे आदेश दिल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या मुरुड येथे आढावा घेण्यासाठी दाखल होत आहेत. सोमय्या यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.