साखरझोपेत असताना घरावर पडली थाप; दापोलीत मध्यरात्री ३ वाजता नागरिकांचे स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 12:02 IST2021-09-07T12:01:45+5:302021-09-07T12:02:06+5:30
हर्णै गावासाठी सोमवारची रात्र ठरली वैऱ्याची

साखरझोपेत असताना घरावर पडली थाप; दापोलीत मध्यरात्री ३ वाजता नागरिकांचे स्थलांतर
दापोली : मध्यरात्रीनंतर लोक साखरझोपेत असताना घरावर थाप पडली आणि घरे खाली करा असा आवाज आला आणि बहुतांश गावकऱ्यांनी रात्र जागूनच काढली. हा प्रकार होता दापोली तालुक्यातील हर्णै गावात सोमवारी रात्री घडलेला. अतिमुसळधार पावसाने सोमवारी रात्री हर्णै गावाला चांगलेच झोडपून काढले आणि बाजारपेठेमध्ये सर्वत्र तीन ते चार फूट पाणी घुसले. त्यामुळे रात्री अचानक तीन वाजता लोकांना घरे खाली करण्यास सांगण्यात आले.
साखर झोपेत असलेल्या लोकांना काही काळ नेमका प्रकार कळला नाही. अनेक लोकांचे रात्रीच स्थलांतरही करण्यात आले. अचानक हर्णै गावाला पुराचा वेढा पडला आणि रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे भीतीपोटी लोकांनी रात्र जागून काढली. हर्णै गावातील अनेक वाड्यामध्ये अशा प्रकारची पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने लोकांमध्ये चिंता पसरली आहे.
दापोलीत ढगफुटी सदृश पावसानं रात्रभर धुमाकूळ घातला आहे. पावसाच्या थैमानानं शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. दापोली शहरातील केळकर नाका शिवाजीनगर, भारत नगर, नागर गुडी, प्रभू आळी, जालगाव खलाटी या परिसरात पुराचे पाणी चार ते पाच फूट वाढले अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने लोकांची धावपळ उडाली आहे. दापोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री एक वाजेपर्यंत शहरातला पूर कायम होता. एक नंतर पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे पाणी ओसरले आहे.
हवामान खात्याकडून पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचं पुन्हा आगमन झालं आहे. भारतीय हवामान खात्यानं पुढील चार ते पाच दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचे असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पालघर जिल्ह्यालाही अलर्ट देण्यात आला आहे. तसंच मुंबई, ठाणे शहरांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.