नात्यांची गुंफण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:19 AM2021-07-05T04:19:53+5:302021-07-05T04:19:53+5:30
गुंफण फुलांची गुंफण शब्दांची गुंफण भावनांची गुंफण नात्यांची आणि माणसांचीसुद्धा... गुंफण म्हणजे वीण. जो गुंफण विणतो त्याला आपण विणकर ...
गुंफण फुलांची
गुंफण शब्दांची
गुंफण भावनांची
गुंफण नात्यांची आणि माणसांचीसुद्धा...
गुंफण म्हणजे वीण. जो गुंफण विणतो त्याला आपण विणकर म्हणूया. फुलांच्या हारांची जो गुंफण करतो, तो हार बनवताना काळजीपूर्वक फुलांची निवड करतो. फुलांचे आकार, प्रकार, रंग, टिकाऊपणा, वजन, इत्यादी अनेक गोष्टी काळजीपूर्वक विचारात घेतो. हारामध्ये झेंडूची फुलं कुठे ओवायची, निशिगंध कुठे ओवायची, एस्टर कुठे गुंफायचा, असा आराखडा मनातल्या मनात तयार करतो. हारासारखी गोष्टसुद्धा सुंदर कशी दिसेल, याच्यावर काम करतो. गुलाबाच्या हारात फक्त गुलाबांची गुंफण. इतर फुलांना तिथे नो एन्ट्री.
बघता-बघता टोपलीतील फुलांचे एका सुंदर हारात रूपांतर होते. हाराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातला धागा दिसत नाही. दिसतो तो फक्त सुंदर, रंगीत, ताजातवाना हार. कधी-कधी धागा तुटतोदेखील. विणकर मोठ्या शिताफीने दोऱ्याची गाठ मारून हाराची अखंडता कायम ठेवतो.
उदाहरण जसे फुलांच्या हारासाठी लागू आहे तसेच माणसांच्या गुंफणेसाठीसुद्धा लागू आहे. येथेही एक विणकर असतो. तो विशिष्ट ध्येय ठेवून माणसांची गुंफण करतो. व्यक्तीची परीक्षा घेऊन, त्याला समजून-उमजून जागा ठरवतो. गुंफणेतील प्रत्येकजण वेगळा असतो. स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते. प्रत्येकाची कौशल्ये, अनुभव, इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता, ताणली जाण्याची क्षमता लक्षात घेऊन योग्य जागी गुंफावे लागते. जसा कपड्यांचा विणकर आपल्या कौशल्याने, अनुभवाने टिकाऊ वस्त्रे विणतो, त्याचप्रमाणे मानवी नात्यांची गुंफण होऊन एक उत्तम, टिकाऊ नात्यातील बंध तयार होतो. बंध घट्ट असतील तर सोन्याहून पिवळे. परंतु, कधी धागे उसवले जातात, विसविशीत होतात. खरा विणकर मात्र नात्यांमधला प्रत्येक धागा आणि त्या धाग्याची इतर धाग्यांशी असलेली गुंफण जपत राहतो.
व्यावसायिक क्षेत्रात, कला क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी योग्य माणसांची गुंफण करता येणे आवश्यक आहे. ते कसबच आहे म्हणा ना! ‘Right person, right place’ यामुळे संपूर्ण रचना / आकृती बंध सर्वांसाठी फलदायी ठरतो. अशी मानवी नात्यांची गुंफण आपण बांधली पाहिजे आणि चिरंतन टिकवली पाहिजे.
- डाॅ. मिलिंद दळवी, तळगाव, ता. मालवण.