देवाचा डोंगर समस्यांच्या विळख्यात
By Admin | Published: May 11, 2016 11:13 PM2016-05-11T23:13:59+5:302016-05-11T23:58:50+5:30
खेड तालुका : पदरमोड करून केलेला रस्ता वाहून गेला; पाण्यासाठी आजही पायपीट
खेड : खेड तालुक्यातील तुळशी देवाचा डोंगर गावातील ग्रामस्थांच्या पाचवीलाच समस्या पूजलेल्या आहेत. उन्हाळ्याच्या हंगामात येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. ग्रामस्थांनी पदरमोड करून तयार केलेला रस्ताही पावसाळ्यात वाहून गेला आहे. त्यामुळे गावात वाहन जाणेही मुश्किल झाले आहे. समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या या गावाला सुगीचे दिवस कधी येणार? असा सवाल होत आहे.
तुळशीपासून तीन किलोमीटर अंतरावर ही वाडी आहे. रस्तादेखील कच्चा आणि दगडधोंड्यातून जाणारा आहे. रामदास कदम यांच्या कारकिर्दीत हा रस्ता तयार झाला आहे़ मात्र, त्यानंतर या कच्च्या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे कोणीही पाहिले नाही़ त्यामुळे रस्त्याची दुरवस्था होऊन हा रस्ताच आता वाहून गेला आहे. त्यामुळे वाहने न्यायची कशी, असा सवाल ग्रामस्थ करत आहेत.
खेड शहरापासून तुळशी देवाचा डोंगर गाव हे वीस किलोमीटर अंतरावर आहे. गावातील धनगरवाडीलगतच महादेवाचे मंदिर आहे. या धनगरवाडीत दहा घरे आहेत. मात्र, येथील ग्रामस्थांना अद्यापही कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध नाही़ या वाडीत लहानसा पाण्याचा पऱ्या आहे़ त्यातील पाणी हे नोव्हेंबर महिन्यापर्यंत पुरते़ मात्र, त्यानंतर या वाडीतील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. वाडी डोंगरावर वसलेली असल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना खाली तुळशी गावात यावे लागते़ अन्यथा खासगी वाहनातून जामगे येथून पाणी आणावे लागते.़ तसेच ज्या ग्रामस्थांकडे वाहने नाहीत त्यांना डोंगरावरून जामगे गावापर्यंत चार किलोमीटरची पायपीट करावी लागते. तसेच पाणी घेऊन पुन्हा डोंगरावर चढणे अशक्यप्राय होत असल्याने दररोज एवढे अंतर ग्रामस्थांना पार करावे लागते. पाण्यासाठी तीन-तीन खेपाही माराव्या लागत आहेत़
रस्ता खराब आणि बिकट असल्याने दोन दिवस पुरेल एवढे पाणी एकावेळेला भरावे लागत आहे़ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या धनगरवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई प्रतिवर्षी जाणवत आहे़ पाऊस सुरू होईपर्यंत या धनगरवाड्यांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे़ ग्रामस्थांना जनावरांनाही पाणी द्यावे लागते. टंचाईच्या काळात पाणी पुरविणे अवघड होत असले तरीही कसलीही तमा न बाळगता ग्रामस्थांना हे करावे लागत आहे़ ग्रामस्थांनी प्रशासनाकडे टँकरची मागणी केली आहे. मात्र, टँकर वाडीत येण्यासाठी रस्ता नसल्याने प्रशासनाचाही नाईलाज झाला आहे़ टँकर वाडीत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. (प्रतिनिधी)
जामगेचा आधार : धनगरवाड्यात पाणीच नसल्याने चार किलोमीटरवरून वाहतूक
तुळशी देवाचा डोंगर गावातील धनगरवाडीचा पाण्याचा आधारच संपल्याने येथील ग्रामस्थांना घरापासून चार किलोमीटर अंतरावरील जामगे गावातध्ये जावे लागत आहे़ देवाच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या छोट्याशा पाण्याच्या डबक्यातील पाणी संपल्याने ही पायपीट सुरू झाली आहे़ जामगे गावातील हे पाणी इथल्या लोकांना मोठा आधार ठरले आहे.