मुंबईकर अजून चिंतेतच; असे कोण म्हणाले- सुखरुप आणणार म्हणतात, पण अद्याप निर्णय नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 01:07 PM2020-05-05T13:07:00+5:302020-05-05T13:12:17+5:30
रत्नागिरी : शासनाने मुंबई , पुणे येथील चाकरमान्यांना कोकणात आणण्याबाबत कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. ज्यावेळी शासन हा निर्णय ...
रत्नागिरी : शासनाने मुंबई, पुणे येथील चाकरमान्यांना कोकणात आणण्याबाबत कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. ज्यावेळी शासन हा निर्णय घेईल, त्यावेळी जिल्हा प्रशासन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी आणेल. सध्या त्यांच्याबद्दल कुठलाही निर्णय झाला नसल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी उपस्थित होते.
सामंत म्हणाले की, शासनाने ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांसाठी काही गोष्टींबाबत शिथिलता दिली आहे. मात्र, त्यासाठी जी नियमावली जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आली, ती नियमावली योग्यप्रकारे न वाचल्याने आज दुकाने उघडल्यानंतर गर्दी झाल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे कोणती दुकाने कशाप्रकारे सुरू ठेवायची, याबाबत व्यापारी संघटनांशी तसेच संबंधित घटकांशी चर्चा करूनच दोन-तीन दिवसांत पुढील निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगिलते की, मुंबई व पुणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याने तिथल्या लोकांना रत्नागिरीत आणण्याचा सध्या कुठलाही विचार नाही. मात्र, जे मजूर किंवा व्यक्ती परराज्यातील आहेत, त्यांना पाठविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तसेच जे जिल्ह्याबाहेर अडकलेले आहेत, त्यांना रत्नागिरीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी लिंक देण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसात कोरोनाचे चार रूग्ण वाढले आहेत. हे रूग्ण मुंबईहून आले असल्याने आता मुंबईतून येणाऱ्यांवर विशेष लक्ष राहणार आहे. मुंबईतून येणाऱ्यांची मुख्य मार्गावर काटेकोर तपासणी करण्यात येत असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. तसा शासन निर्णय झाला तर येणाऱ्या व्यक्ती कुठल्या भागातून येणार आहेत, त्यावर त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवायचे की घरीच त्यांचे विलगीकरण करायचे, याबाबत निर्णय घेतला जाईल, असे मिश्रा म्हणाले. रिक्षा बंदीबाबत अजूनही स्पष्टता नाही. त्याबाबत मार्गदर्शन मागविले आहे. त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले.
अर्जांचा खच
प्रशासनाने दिलेल्या लिंकद्वारे जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी १६ हजार ३०० लोकांनी अर्ज केले आहेत. रत्नागिरीत येण्यासाठी २२ हजार २०० व्यक्तिंनी लिंकद्वारे अर्ज केले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.