कोल्हापूर खंडपीठ सहा जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे- न्यायमूर्ती भूषण गवई

By शोभना कांबळे | Published: October 8, 2023 01:44 PM2023-10-08T13:44:23+5:302023-10-08T13:44:34+5:30

गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या भित्तीचित्राचे रत्नागिरीत अनावरण 

Kolhapur bench important for six districts, said that Justice Bhushan Gavai | कोल्हापूर खंडपीठ सहा जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे- न्यायमूर्ती भूषण गवई

कोल्हापूर खंडपीठ सहा जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे- न्यायमूर्ती भूषण गवई

googlenewsNext

रत्नागिरी : हर्बर लिंकमुळे पुण्याचा माणूस मुंबईला दोन तासात जाऊ शकतो. परंतु, चंदगडसारख्या टोकाच्या तालुक्यातील तसेच कर्नाटक सीमेवरील गावांतील व्यक्ती मुंबईला इतका प्रवास करुन जाणं, हे अत्यंत खर्चिक आहे. त्याचा वेळ आणि खर्च वाचविण्यासाठी उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी उच्च न्यायालय सकारात्मक विचार करेल, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मांडले.

येथील जिल्हा न्यायालयात गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या भित्तीचित्राचे अनावरण न्यायमूर्ती गवई यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्रकुमार उपाध्याय, उद्योगमंत्री उदय सामंत, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी, महाराष्ट्र, गोवा बार कौन्सीलचे अध्यक्ष विवेक घाटगे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सीलचे सदस्य संग्राम देसाई, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. दिलीप धारिया आदी उपस्थित होते.

न्यायमूर्ती श्री. गवई म्हणाले, रत्नांची खाण असणाऱ्या जिल्ह्यात गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांचे आयसीएस असणारे बंधू सत्येंद्रनाथ टागोर हे येथे जिल्हा न्यायाधीश होते. या एक वर्षांच्या कालावधीत गुरुदेव टागोरांनी रत्नागिरीत काव्य लेखन केले. हा योगायोग म्हणायला हवा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटना समिती समोरील भाषणे वाचली, तर देशाची घटना काय आहे, याची कल्पना येईल. बाबासाहेबांची या देशाकरिता, नागरिकांकरिता काय तळमळ होती, हे या भाषणांतून दिसून येते. सर्वसामान्य जनतेला राजकीय बरोबर, आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळायला हवा, हे त्यांचे ब्रीद होते, असेही ते म्हणाले.

न्यायमूर्ती उपाध्याय यांनी हा सोहळा ऐतिहासिक आहे. कोकणभूमी ही पवित्र भूमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांची ही भूमी वीर सावरकरांची आठवण करुन देणारी कोकण भूमी आहे. देशाचे आयकॉन असणारे गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी काही काळातील वास्तव्यात काव्यलेखन केले, ही गोष्ट रत्नागिरीसाठी नाही, तर संपुर्ण देशासाठी अभिमानास्पद असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी टागोरांच्या बंगाली काव्याचे इंग्रजीतील रूपांतरही एेकवले. उद्योगमंत्री सामंत यांनीही रत्नागिरीकरांसाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगून न्याय व्यवस्था पारदर्शक असतेच पण ती नम्रही असते, हे रत्नागिरीच्या या व्यासपीठाने दाखवून दिले आहे. बार कौन्सीलसाठी आवश्यक असणाऱ्या जागेसाठी शासनस्तरावर निश्चित प्रयत्न केला जाईल, असेही ते म्हणाले.

बहुआयामी व्यक्तीमत्व गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांचे हे शिल्प प्रेरणा देणारे आहे, ते सदैव प्रेरणा देत राहील, असे विचार पालक न्यायमूर्ती जामदार यांनी व्यक्त केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. जोशी यांनी स्वागत व प्रास्ताविकात टागोर यांच्या भित्तीशिल्पाविषयी पार्श्वभूमी सांगितली. महाराष्ट्र व गोवा बार कौन्सीलचे अध्यक्ष घाटगे, सदस्य देसाई, ॲड. दिलीप धारिया यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक आर. एन .जोशी, माजी न्यायमूर्ती पी.आर. बोरा, प्रबंधक निरिक्षक ए. डी. बिले, माजी न्यायाधीश एम.डी. केसरकर, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आदीसंह सर्व वकील व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Kolhapur bench important for six districts, said that Justice Bhushan Gavai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.