कोल्हापूर महामार्गाचा रस्ता खचला, तात्पुरती उपाययोजना
By मनोज मुळ्ये | Published: June 30, 2023 09:30 AM2023-06-30T09:30:47+5:302023-06-30T09:31:19+5:30
गुरुवारी मध्यरात्री मातीचा भराव खचला. त्यात एक ट्रही अडकला. त्यामुळे वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती.
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गापाठोपाठ आता मिऱ्या - कोल्हापूर - नागपूर महामार्गावर नाणीज येथे रस्ता खचला आहे. गुरुवारी मध्यरात्री मातीचा भराव खचला. त्यात एक ट्रही अडकला. त्यामुळे वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती.
बुधवारी मध्यरात्री मुंबई-गोवा महामार्गावर निवळी ते हातखंबा दरम्यान रस्ता खचला. गुरुवारी रात्री असाच प्रकार मिऱ्या - कोल्हापूर - नागपूर महामार्गावर नाणीज येथे घडला. या महामार्गाचेही रुंदीकरणाचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी मातीचा भराव टाकण्यात आला आहे.
दोन तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने नाणीज येथे हा भराव खचला. त्यामुळे रात्री साडेबारा वाजल्यापासून रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी ठेकेदाराकडून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे. मात्र अजूनही वाहतुकीवर मोठा परिणाम दिसून येत आहे.