बांगलादेशी घुसखोरीचे कोलकाता ‘कनेक्शन’, चिपळुणात चौघांना अटक, आज न्यायालयात हजर करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 12:10 PM2024-04-22T12:10:28+5:302024-04-22T12:10:53+5:30
चिपळुणात आधार कार्ड तयार
चिपळूण : शहरातील रावतळेसह मार्कंडी येथून अटक केलेल्या बांगलादेशींनी पश्चिम बंगालमार्गे काेलकात्याहून पुढे महाराष्ट्रात घुसखोरी केल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. विशेष म्हणजे, काेलकात्यातच त्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार करून घेतल्याचेही स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अटक केलेल्या दोघांना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी रत्नागिरी दहशवाद विरोधी पथकाने शहरातील रावतळे येथून रुख्साना आलमगीर मंडल, आलमगीर अरबली मंडल या दोन बांगलादेशी पती-पत्नीला शहरातील रावतळे येथून ताब्यात घेत अटक केली. त्या दोघांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. चिपळुणात सापडलेले बांगलादेशी महाराष्ट्रात आले कसे, याचा शाेध सुरू हाेता. हे बांगलादेशी पश्चिम बंगालमार्गे येत असल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे.
तसेच महंमद अली, असाद सिरीना या आणखी दोन बांगलादेशी तरुणांना रत्नागिरी दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली आहे, तेही पश्चिम बंगालमार्गे पुढे महाराष्ट्रात आल्याची माहिती पुढे येत आहे. अटकेतील चौघा बांगलादेशींची सोमवारी पोलिस कोठडी संपत असून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
महाराष्ट्रात २५ वर्षे वास्तव्य
बांगलादेशी मंडल कुटुंब २००१ साली त्यांच्या मामासोबत पश्चिम बंगालमार्गे काेलकात्यात आले. त्यानंतर, त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. अखेर त्यांनी महाराष्ट्र गाठले. काेलकात्याहून महाराष्ट्रात आलेल्या मंडल दाम्पत्याला महाराष्ट्रात जवळपास २५ वर्षे झाली आहे. ते आपला उदारनिर्वाहासाठी बांधकाम व्यावसाय करून संसार चालवतात.
चिपळुणात आधार कार्ड तयार
मुळात जवळपास २५ वर्षे वास्तव्यास असलेले मंडल बांगलादेशी काेलकात्यात आल्यानंतर त्यांनी तेथेच जन्मदाखले तयार केले. त्या आधारावर पुढे त्यांनी चिपळुणात अधिकृतरीत्या आधार कार्ड तयार केला, शिवाय बांगलादेशी असल्याचा कुणाला संशय येऊ नये, तसेच एखादे वेळी कुणी चौकशी केलीच, तर ते उत्तर प्रदेश येथील असल्याचे सांगत हाेते.