तब्बल ७८ दिवसांनी कोंडगाव बाजारपेठ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:21 AM2021-06-29T04:21:22+5:302021-06-29T04:21:22+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गानजीक असणारी कोंडगाव बाजारपेठ कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे १४ एप्रिलपासून ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गानजीक असणारी कोंडगाव बाजारपेठ कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे १४ एप्रिलपासून बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली हाेती. तब्बल ७८ दिवसांनी साेमवारी ही बाजारपेठ पूर्ववत सुरू करण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. काेराेना नियमांचे पालन करत सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच ही बाजारपेठ सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काेराेनाच्या काळात कोंडगावमधील जनता व व्यापारी, सर्व रिक्षाचालक शासनाच्या नियमांचे पालन करत होते. सततच्या लॉकडाऊनमुळे जनता त्रस्त झाली होती, मात्र कोरोना रुग्णांची संख्या सतत दोलायमान होत असल्याने कोंडगावमध्ये निर्बंध कडक करण्यात आले होते. साेमवारी येथील बाजारपेठ सुरू करण्यात आली. या बाजारपेठेवर चाळीस गावे अवलंबून असल्याने त्यांची अडचण झाली हाेती.
सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने बाजारपेठ सुरू होणे आवश्यक होती. मात्र, त्यासाठी सर्वांची कोरोना चाचणी सुरू करण्यात आली व त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. काेंडगावमधील तपासणी शंभर टक्के करण्याचा मानस सरपंच बापू शेट्ये यांनी व्यक्त केला आहे.
आमदार राजन साळवी, सभापती जयसिंग माने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ़ इंदुराणी जाखड, कोंडगाव सरपंच बापू शेट्ये, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्रीधर कबनूरकर, भाजपचे अमित केतकर, तंटामुक्ती अध्यक्ष संजय गांधी, पोलीस यंत्रणा, आरोग्य खाते, पोलीस पाटील मारुती शिंदे, व्यापारी या सर्वांनी कोंडगाव बाजारपेठ सुरू करण्यासाठी व कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाचे मार्गदर्शक तत्व पाळून प्रयन केले. त्याला यश आले असून, ही बाजारपेठ सुरू करण्यात आली आहे.
--------------------
काेराेनाच्या काळात व्यापारी आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केले आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे काेराेना तपासणीचे काम चांगल्या प्रकारे झाले आहे. काेराेनामुक्त काेंडगाव हाेण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने शासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. व्यापाऱ्यांनीही नियमांचे पालन करूनच आपले व्यवसाय करावेत.
- बापू शेट्ये, सरपंच, काेंडगाव