कोंडीचे भाटी....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:20 AM2021-07-12T04:20:11+5:302021-07-12T04:20:11+5:30
गाडगीळ गुरुजी गेले तरी त्यांचं ते जुनाट कौलारू नळ्यांचं घर आम्ही पाहिलं आहे. त्याच घराच्या समोरील पायवाटेने मी बाबा ...
गाडगीळ गुरुजी गेले तरी त्यांचं ते जुनाट कौलारू नळ्यांचं घर आम्ही पाहिलं आहे. त्याच घराच्या समोरील पायवाटेने मी बाबा बरोबर दामल्यांच्या परड्यात जायचो. तेव्हा त्या घरात गाडगीळ गुरुजींची विधवा पत्नी व त्यांनी अनाथ म्हणून सांभाळलेला वासू नावाचा मुलगा राहायचे. हा वासू खूप साधाभोळा होता. त्याचं वागणं, बोलणं, चालणं बायकांप्रमाणे होतं. गावातले अनेकजण या वासूची टिंगल करीत. गाडगीळ गुरुजींचं घर खूप प्रशस्त असलं तरी अगदी टापटीप होतं. या गाडगीळ गुरुजींचं समाजकार्य खूप मोठं होतं. कडक शिस्तीचे असले तरी ते कनवाळूही होते. गावातील व परिसरातील अनेक गरिबांना त्यांनी मदतीचा हात दिला होता. गावात माध्यमिक विद्यालय व वाचनालय सुरू करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. खूप वर्षांपूर्वी त्यांचा एकुलता एक मुलगा नोकरीनिमित्ताने अमेरिकेत स्थिरावला होता. त्यामुळे गाडगीळ गुरुजी, त्यांची पत्नी आणि हा वासू असे तिघेच त्या प्रशस्त घरात राहात. निराधार म्हणून आश्रय दिलेला गोंद्या त्यांच्या घराची व बागेची साफसफाई करत असे. घराजवळचा गुरांचा मांगर गुरुजींनी या गोंद्याला राहण्यासाठी दिला होता. याच मांगरात राहून इतर कामं करता करता गोंद्या गुरुजींच्या दोन म्हशीही राखून आणायचा.
गाडगीळ गुरुजींच्या घराभोवती विविध फुलझाडांची व शोभेच्या झाडांची बाग होती. तळ्यावर कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या बायांची पाणंद गुरुजींच्या घरासमोरून जात असली तरी वाटेने जाणारे कोणीही या झाडांना हातही लावू शकत नव्हते. चुकून कोणी एखादं फूल खुडलं किंवा फांदी मोडली तर गुरुजी जमदग्नीचा अवतार धारण करीत असत. गुरुजींच्या घरासमोर नारळाची मोठी बाग होती. बागेत पोफळीही खूप होत्या. याशिवाय पपनीस, पेरू, आवळा, लिंबू, अननस यांसारखी अनेक फळझाडंही होती. तळ्याच्या मुशीतून बाहेर सोडलेलं पाटाचं पाणी गुरुजींच्या बागेत जात असे.
गाडगीळ गुरुजींनंतर काही वर्षांनी त्यांच्या पत्नीचेही निधन झाले. साधाभोळा वासूही कुठेतरी निघून गेला. गोंद्याने नंतरची काही वर्षे या घराचा पसारा सावरण्याचा प्रयत्न केला. पण नंतर तोही दुसरीकडे पोटापाण्यासाठी निघून गेला. पुढे पुढे गाडगीळ गुरुजींच्या घराची पडझड सुरू झाली. ही पडझड थांबविण्यासाठी गुरुजींचा अमेरिकेतला मुलगा इकडे कधीच फिरकला नाही. आज गाडगीळ गुरुजींचे घर प्रत्यक्षात अस्तित्त्वात नाहीच. त्यांची बागही आता तशी नामशेष झाली आहे. घराचे अवशेष दाखवणारा चौथराही आता जंगली झुडुपांत गडप झाला आहे. गाडगीळ गुरुजींच्या तेथील सर्व खुणा आता नष्ट झाल्या आहेत. मात्र, गाडगीळ गुरुजींच्या एका वंशजांनी तळ्याच्या काठावरच्या पुरातन व पडक्या मंदिराच्या जागेवर नवे भव्य व सुंदर मंदिर बांधले आहे. एखाद्या संध्याकाळी या मंदिरात बसल्यावर मला माझ्या बाबाचे शब्द आठवतात. माझा बाबा अशा काही घटनांच्या बाबतीत म्हणायचा, ‘बाळग्या, आयुष्य ह्या असा आसता... कधी कोंडीचे भाटी, तर कधी भाटीचे कोंडी!’ भाटी म्हणजे ओहोटी आणि कोंड म्हणजे भरती या अर्थाची ती म्हण बाबा सर्रास वापरायचा. भरती म्हणजे वैभव व ओहोटी म्हणजे दारिद्र्य, असाही या म्हणीचा अर्थ होता. माझा बाबा म्हणजे असं चालतं बोलतं पुस्तक होतं. अनेक शब्दांचा व म्हणींचा खजिना त्याला मुखोद्गत होता. आजही कधीकाळी पडझड झालेल्या त्या मंदिराचं आणि गाडगीळ गुरुजींच्या वैभवशाली घराचं चित्र आठवणींच्या डोळ्यांसमोर येतं आणि माझ्या बाबाची ती म्हण आपसुकच माझ्या ओठांवर येते, ‘भाटीचे कोंडी नि कोंडीचे भाटी!’
बाबू घाडीगांवकर, जालगांव, दापोली.