HSC Result2024: राज्यात सलग १३ व्या वर्षी कोकण बोर्ड अव्वल
By मेहरून नाकाडे | Published: May 21, 2024 02:07 PM2024-05-21T14:07:13+5:302024-05-21T14:08:29+5:30
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र ...
रत्नागिरी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून एकूण निकाल ९७.५१ टक्के लागला आहे. कोकण विभागाची स्थापना २०१२ साली झाली. तेव्हापासून कोकण बोर्डाने राज्यात उत्कृष्ट निकालाची परंपरा राखत अव्वल क्रमांक आबाधित ठेवला आहे.
राज्यातील एकूण नऊ मंडळामध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक आहे. या विभागातील रत्नागिरी सिंधुदूर्ग दोन्ही जिल्हयातून २५ हजार ७९३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी २५ हजार १५३ विद्यार्थी पास झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत १.५ टक्केने वाढला आहे. कोकण बोर्डात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.६० टक्के तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.४२ टक्के आहे.
कोकण बोर्डात उत्कृष्ट निकालामध्ये सलग बाराव्या वर्षी सिंधुदूर्ग जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. कोकण बोर्डाच्या प्रभारी सचिव सुवर्णा सावंत यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून बोर्डाने सलग १३ वर्षे उत्कृष्ट निकालाची परंपरा राखली असल्याचे सांगितले.
राज्यात गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढली
यंदा परीक्षेला बसलेल्या १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांपैकी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीचा निकाल ९३.३७ टक्के एवढा लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी २.१२ टक्क्यांनी जास्त आहे. गतवर्षी २०२३ चा निकाल ९१.३५ टक्के एवढा लागला होता.