बारावी निकालात कोकण आठव्यादा अव्वल, कोकण मंडळाचा ९३.२३ टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 04:28 PM2019-05-28T16:28:56+5:302019-05-28T16:31:04+5:30
बारावीच्या निकालामध्ये कोकण मंडळाने स्थापनेपासून राज्यात अव्वल स्थान मिळविले असून, गतवर्षीच्या तुलनेत १.६२ टक्क्यांनी निकाल कमी लागला असल्याची माहिती मंडळाच्या विभागीय सहसचिव भावना राजनोर यांनी दिली. यावेळी माध्यमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी देविदास कुल्लाळ उपस्थित होते.
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण निकाल ९३.२३ टक्के इतका लागला आहे. बारावीच्या निकालामध्ये कोकण मंडळाने स्थापनेपासून राज्यात अव्वल स्थान मिळविले असून, गतवर्षीच्या तुलनेत १.६२ टक्क्यांनी निकाल कमी लागला असल्याची माहिती मंडळाच्या विभागीय सहसचिव भावना राजनोर यांनी दिली. यावेळी माध्यमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी देविदास कुल्लाळ उपस्थित होते.
राज्यातील एकूण ९ मंडळांमध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ पुणे विभागाचा ८७.८८ टक्के, तर अमरावती विभागाचा ८७.५५ टक्के इतका निकाल लागला आहे. पुणे व अमरावती विभागांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा क्रमांक मिळविला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सर्वाधिक कमी निकाल नागपूर विभागाचा असून ८२.५१ टक्के इतका लागला आहे.
रत्नागिरी - सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यातून ३१ हजार ७७५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी २९ हजार ६१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण मंडळातून १६ हजार ५२३ मुलगे परीक्षेस बसले होते, पैकी १४ हजार ९१२ मुलगे उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.२५ टक्के इतके आहे, तर मंडळातून १५ हजार २४१ मुली परीक्षेस बसल्या होत्या. पैकी १४ हजार ७०० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.४५ टक्के आहे. संपूर्ण निकालात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक असून, मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ६.२ने अधिक आहे. गतवर्षी मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ४.४४ टक्के होती. गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्णतेची टक्केवारी यावर्षी पुन्हा वाढली आहे.