कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक: रत्नागिरी जिल्ह्यात ६४.३५ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 12:03 PM2024-06-27T12:03:53+5:302024-06-27T12:04:23+5:30

मतदानासाठी दिवसभर पावसाचीही हजेरी; १२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत

Konkan Graduate Constituency Election: 64.35 percent polling in Ratnagiri district | कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक: रत्नागिरी जिल्ह्यात ६४.३५ टक्के मतदान

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक: रत्नागिरी जिल्ह्यात ६४.३५ टक्के मतदान

रत्नागिरी : कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी बुधवार, दि. २६ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी कोकण विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण ५९.३१ टक्के मतदान झाले. रत्नागिरी जिल्ह्यात ६३.३५ टक्के मतदान झाले. ३८ केंद्रांवर १४,३६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पहाटेपासूनच रत्नागिरीत मुसळधार पाऊस असल्याने मतदारांचा निरुत्साह जाणवला. येत्या १ जुलै रोजी कोकण आयुक्त कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदारांची ५ जुलै रोजी मुदत संपत आहे. त्या अनुषंगाने ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी काॅंग्रेसतर्फे रमेश कीर, भाजपातर्फे निरंजन डावखरे हे दोन प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार तसेच विश्वजित खंडारे, अमोल पवार, अरुण भोई, अभय म्हात्रे, गोकुळ पाटील, नागेश निमकर, प्रकाश वडपेल्ली, मिलिंद पाटील, ॲड. शैलेश वाघमारे आणि श्रीकांत कामूर्ती असे एकूण १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

बुधवारी सकाळी सात वाजता जिल्ह्यातील ३८ मतदान केंद्रांवर मतपत्रिकेद्वारे मतदानाला प्रारंभ झाला. सुरुवातीला मतदानाची टक्केवारी कमी होती. त्यानंतर त्यात वाढ होत गेली. सायंकाळी जिल्ह्यातील एकूण २२,६८१ मतदारांपैकी १४,३६८ मतदारांनी (६३.३५ टक्के) मतदानाचा हक्क बजावला. सर्वच मतदान केेंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. यासाठी ३८ मतदान केंद्रावर मिळून एकूण २५८ कर्मचारी कार्यरत होते. तसेच १५२ पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.

बुधवारी सायंकाळी मतदान झाल्यानंतर खेड, दापोली आणि मंडणगड येथील मतपेट्या खेड तहसील येथे पाठविण्यात आल्या. चिपळूण आणि गुहागरच्या मतपेट्या चिपळूण तहसील कार्यालयात; तर उर्वरित तालुक्यांमधील मतपेट्या येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आणल्या जातील. २७ रोजी त्या कोकण आयुक्त कार्यालयात पाठविण्यात येणार आहेत. या कार्यालयात १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. या प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, अप्पर जिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड उपस्थित राहणार आहेत.

सिंधुदुर्गात सायंकाळी पाचपर्यंत ७३.६२ टक्के मतदान

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३४ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी ५ पर्यंत ७३.६२ टक्के मतदान झाले. या मतदारसंघात १३ उमेदवार निवडणूक रिंगणात असून खरी लढत ही काँग्रेसचे रमेश कीर आणि भाजपचे निरंजन डावखरे यांच्यात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण १८ हजार ५५१ मतदार आहेत. यात ११ हजार ५० पुरुष व ७ हजार ५०१ महिला मतदारांचा समावेश आहे.

Web Title: Konkan Graduate Constituency Election: 64.35 percent polling in Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.