कोकण कृषी विद्यापीठ कुलगुरु पद भरतीसाठी हालचाली, लवकरच जाहीरात होणार प्रसिध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 06:41 PM2018-11-01T18:41:44+5:302018-11-01T18:43:20+5:30

कोकण कृषी विद्यापीठाचे रिक्त कुलगुरू पद भरण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, लवकरच जाहिरात प्रसिद्ध होऊन कुलगुरू निवड प्रक्रिया पूर्ण होऊन विद्यापीठाला हक्काचा कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे.

Konkan Krishi Vishwavidyalaya Vice Chancellor post for recruitment, soon to be announced in the public | कोकण कृषी विद्यापीठ कुलगुरु पद भरतीसाठी हालचाली, लवकरच जाहीरात होणार प्रसिध्द

कोकण कृषी विद्यापीठ कुलगुरु पद भरतीसाठी हालचाली, लवकरच जाहीरात होणार प्रसिध्द

googlenewsNext
ठळक मुद्देकोकण कृषी विद्यापीठ कुलगुरु पद भरतीसाठी हालचाली, लवकरच जाहीरात होणार प्रसिध्द दापोलीला हक्काचा कुलगुरु मिळण्याच्या आशा पल्लवित

दापोली : कोकण कृषी विद्यापीठाचे रिक्त कुलगुरू पद भरण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, लवकरच जाहिरात प्रसिद्ध होऊन कुलगुरू निवड प्रक्रिया पूर्ण होऊन विद्यापीठाला हक्काचा कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे.

दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात दोन महिन्यापासून कुलगुरूपद रिक्त आहे. कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद तुर्तास रिक्त आहे. राजीनाम्यानंतर तीन महिन्यांचा नोटीस कालावधी संपल्यावर ३१ आॅगस्ट रोजी डॉ. भट्टाचार्य यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.

कुलगुरू नियुक्तीसंदर्भात राजभवनमध्ये कुलगुरू निवड समितीसमवेत झालेल्या राज्यपाल यांच्या बैठकीत जाहिरात मसुदा व नोडल आॅफिसर नियुक्ती या दोन विषयांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता कुलगुरू निवडपदाच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.

पुढील आठवड्यात अथवा याच आठवड्याच्या शेवटी कुलगुरूपदासाठीचे अर्ज मागविण्यासाठी जाहिरात प्रसिध्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन ते अडीच महिन्यांत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला नविन कुलगुरू मिळतील, अशी आशा आहे.

राज्यपाल यांच्याकडून त्रिस्तरीय सदस्यांची कुलगुरू निवड समिती जुलैच्या पहिल्या आठवड्यात तीन महिन्यांपूर्वीच गठीत करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश मंजुला चेल्लूर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे.

यामध्ये पदसिध्द असलेले राज्य शासनाच्या कृषी विभागाचे अतिरिक्त सचिव तसेच देशातील कृषी विद्यापीठाची शिखर संस्था असलेल्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोसन महापात्रा, राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांचा समावेश या निवड समितीत आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकित नोडल आॅफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे. १ सप्टेंबर पासून दापोली कृषी विद्यापीठाचा कुलगुरू पदाचा कार्यभार राहुरी येथील डॉ. के. पी. विश्वनाथा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

सध्या प्रभारी असलेल्या कुलगुरू पदामुळे कृषी विद्यापीठातील महत्वाचे निर्णय, कामकाज यामध्ये परिणाम होत आहे. त्यामुळे नियमित स्वरूपातील कुलगुरूंची लवकर नियुक्ती झाल्यास कोकण कृषी विद्यापीठाचा कारभार व महत्वपूर्ण निर्णय आदी विषयांना गती मिळेल.

कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू निवड प्रक्रियेला गती मिळाल्यानं कुलगुरू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या रिक्तपदी मराठी कुलगुरू मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Web Title: Konkan Krishi Vishwavidyalaya Vice Chancellor post for recruitment, soon to be announced in the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.