कोकण मर्कं टाईल : १७ जणांना अटक
By admin | Published: November 21, 2014 11:46 PM2014-11-21T23:46:53+5:302014-11-22T00:08:48+5:30
संख्या ३०वर : सराफ व निवृत्त शाखाधिकाऱ्यांचा समावेश
देवरुख : कोकण मर्कं टाईल को-आॅप. बँकेच्या संगमेश्वर शाखेतील बनावट दागिन्यांप्रकरणी पोलिसांनी आज, शुक्रवारी एक सराफ, दोन निवृत्त शाखाधिकाऱ्यांसह १७ जणांना अटक केली. या प्रकरणात बँकेची दोन कोटी ८२ लाख ७७ हजार ६४९ रुपयांची फसवणूक करण्यात आली असून, यात ३९ जण सहभागी आहेत.
या १७ जणांना आज उशिरा सायंकाळी देवरुख न्यायालयात हजर केले असता त्यांची दि. २७ पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आजपर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या ३० वर पोहोचली आहे. या घटनेबाबतची फिर्याद मुंबई शाखेचे सहायक व्यवस्थापक अकबर युसूफ कोंडकरी (वय ४७, रा. मुंबई) यांनी ४ आॅक्टोबर २०१४ रोजी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली होती. हा बनावट सोनेतारण फसवणुकीचा प्रकार १८ मे २०१२ ते १९ सप्टेंबर २०१४ या कालावधीत घडला आहे.
या प्रकरणाच्या तपासाला आता चांगलीच गती मिळाली असून, बरेच दिवस पोलिसांच्या हाती न लागलेल्या बँकेच्या सराफाला अटक करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणाचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोहर चिखले करीत आहेत. या प्रकरणी आज उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांनी संगमेश्वर येथे भेट देऊन मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
अटक केलेल्यांची नावे अशी
सराफ उदय सैतवडेकर (संगमेश्वर), निवृत्त शाखाधिकारी तौफिक इब्राहिम सादिम (रत्नागिरी), नासीर खान उमरखान मापारी (मुचरी - संगमेश्वर) याबरोबरच विनोद कुळ्ये, नौशाद अब्बास खान (चिपळूण), शौकत याकूब अलवारे (चिपळूण), मेहताज महमम इसाकतांबे (चिपळूण), अनिसा अलिमिया काझी (गोवळकोट-चिपळूण), हतीजा दाऊद बेबल (गोवळकोट), मरियांबी इस्माईल हिलवान (कोंडवरी), सुलेमान इब्राहिम खान (चिपळूण), यासीन युसूफ नाईक (फुणगूस), सतीश गमरे (चिपळूण), इकबाल महमद मुल्ला (कळंबस्ते), जाहीर जमारुद्दीन कोळथरकर (चिपळूण), नसीना इक्बाईल मुल्ला व साजिया इक्बाल मुल्ला (रा. कळंबस्ते, संगमेश्वर) यांचा समावेश आहे.