नव्याकोऱ्या मांडवी एक्स्प्रेसला बिघाडाचे ग्रहण, सतत एसी बंद पडल्याने प्रवासी हैराण 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 05:49 PM2019-06-11T17:49:09+5:302019-06-11T17:50:41+5:30

आज मडगावहून मुंबईकडे येत असलेल्या मांडवी एक्स्प्रेच्या एसी कोचमधील एसी सातत्याने बिघडत असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे. 

konkan Railway : AC failure in the new Mandvi Express | नव्याकोऱ्या मांडवी एक्स्प्रेसला बिघाडाचे ग्रहण, सतत एसी बंद पडल्याने प्रवासी हैराण 

नव्याकोऱ्या मांडवी एक्स्प्रेसला बिघाडाचे ग्रहण, सतत एसी बंद पडल्याने प्रवासी हैराण 

Next

रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मांडवी आणि कोकणकन्या या गाड्या सोमवारपासून नव्या रूपात धावू लागल्या आहेत. बदलेले डबे आणि रंगरूप यामुळे गाड्यांच्या या नव्या रूपाची चर्चा सुरू आहे. मात्र या नव्याकोऱ्या गाडीला दुसऱ्याच दिवशी बिघाडाचे ग्रहण लागले असून, आज मडगावहून मुंबईकडे येत असलेल्या मांडवी एक्स्प्रेच्या एसी कोचमधील एसी सातत्याने बिघडत असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे. 


आज सकाळी मडगाववरून मांडवी एक्स्प्रेस रवाना झाल्यानंतर तिच्या एसी डब्यांमधील एसीमध्ये सातत्याने बिघाड निर्माण झाला. प्रत्येक एसी डब्यातील डीसी ट्रीप होत असल्याने एसी बंद होत आहेत. राजापूर, रत्नागिरी, चिपळून, खेडदरम्यान चार वेळा एसी बंद पडल्याचे प्रवाशांनी सांगितले. तसेच सतत एसी बंद पडत असल्याने प्रवाशांची घुसमट होत असून, अनेक प्रवासी उकाड्याने हैराण झाले आहेत. 
त्याशिवाय कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसच्या डब्यांची रचना बदलल्याने ट्रेन स्टेशनवर आल्यानंतर सर्व डबे त्यांच्या निर्धारित स्थळापासून पुढे किंवा मागे थांबत आहेत. त्यामुळे प्रवाशांची धावपळ होत आहे. तसेच पँट्री कारमध्ये पारंपरिक गॅसऐवजी हीटर ठेवण्यात आल्याने नाश्ता तयार करण्यास उशीर होत आहेत. दरम्यान, या प्रकरणी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

कोकण रेल्वेने या दोन्ही एक्सप्रेस गाड्यांचे रुप पावसाळ्यात बदलण्याचे ठरविले होते. त्यानुसार आधीच्या निळ्या रंगातील इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नाईच्या या गाड्यांच्या बोगीऐवजी आता प्रवासी क्षमता अधिक असलेल्या व लाल-करड्या रंगातील लिके होल्फमन बूश बोगी जोडल्या गेल्या आहेत.. या गाड्यांमध्ये अत्याधुनिक प्रसाधनगृहे, आरामदायी बैठक व्यवस्था आहे. 

एलएचबी डब्यांच्या शयनयान बोगींमध्ये ७२ ऐवजी ८० प्रवासी झोपू शकणार आहेत. एसी थ्री टायर श्रेणीतील बी १ ते बी ५ या बोगींमधील प्रवासी क्षमताही ६४ ऐवजी ७२ होणार आहे. एसी २ टायरमध्ये ५४ व एचए १ मध्ये २४ प्रवासी क्षमता असेल. त्यामुळे कोकणकन्यामध्ये १२४ तर मांडवी एक्सप्रेसमध्ये ९४ प्रवासी क्षमता वाढली आहे. दरम्यान, निळ्या रंगाऐवजी लाल व करड्या रंगाचा साज श्रुंगार करून या दोन्ही गाड्या १० जून ते ३१ आॅगस्ट २०१९ दरम्यान कोकण रेल्वे मार्गावरून धावणार आहेत. त्यानंतर गाड्या नियमित होतील.

Web Title: konkan Railway : AC failure in the new Mandvi Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.