कोकण रेल्वेची ‘घसरण’ सुरूच !
By admin | Published: August 24, 2014 11:53 PM2014-08-24T23:53:16+5:302014-08-25T00:04:14+5:30
मालगाडीचे आठ डबे घसरले : रेल्वेवाहतूक ठप्प
खेड : कोकण रेल्वे मार्गावरील वीर आणि करंजाडी स्थानकांदरम्यान मालवाहू गाडीचे ८ डबे आज, रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घसरल्याने मार्गावरील प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वेच्या १४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, लांब पल्ल्याच्या सात गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. कोकण रेल्वेमार्गावरील डबे घसरण्याची गेल्या सहा महिन्यांतील ही चौथी घटना आहे.
खेडनजीकच्या वीर ते करंजाडी स्थानकांदरम्यान आज सकाळी मालगाडीचे आठ डबे घसरले. रेल्वेचे रूळ काही ठिकाणी तुटल्याने ही घटना घडली. सात डबे एका ठिकाणी, तर एक डबा रुळावरून पूर्णपणे घसरला. मालवाहू गाडी घसरल्याने कोकण रेल्वेच्या खेड स्थानकात येणाऱ्या व जाणाऱ्या १४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर सात गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला. कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरून येणाऱ्या मुंबई आणि दिल्लीकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे. दुपारी खेड स्थानकात एकही गाडी नसल्याने स्थानक रिकामे झाले होते. वीर स्थानकात अडकलेल्या आणि गोव्याच्या
दिशेने जाणाऱ्या तसेच मुंबई आणि दिल्लीकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांना आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नेहमीप्रमाणे बसचा आधार घेतला.
खेड, दापोली आणि चिपळूण एस. टी. आगारांतून प्रत्येकी८, ७ आणि १० बसेस खेड स्थानकात दाखल झाल्या. या तिन्ही आगारांतील २५ गाड्यांनी प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली. खेड स्थानकात दुपारी १ वाजता आलेल्या चंदीगढ-कोचुवेली या रेल्वेतील हजारो प्रवासी उतरले होते. यातील ज्या प्रवाशांना मुंबई आणि दिल्लीकडे जायचे होते, त्या प्रवाशांना या २५ बसेसमधून वीर स्थानकापर्यंत सोडण्यात आले. वीर स्थानकात थांबवून ठेवलेल्या गोवा-क्रांती एक्स्प्रेसमधून या प्रवाशांना मुंबई आणि दिल्लीकडे नेण्याची व्यवस्था करण्यात आली.
वीर स्थानकात थांबवून ठेवलेल्या गोवा संपर्क क्रांती एक्स्प्रेसमधील शेकडो प्रवाशांना नजीकच्या महाड आणि माणगाव आगारातील २५ एसटी बसेसमधून खेड स्थानकापर्यंत सोडण्यात आले़ (पान ५ वर)
रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी एसटी महामंडळाकडे केलेल्या विनंतीनंतर महामंडळानेही ५० एसटी बसेसची व्यवस्था केल्याने प्रवाशांना वीर आणि खेड स्थानकांपर्यंत सोडणे शक्य झाले. तेथून या प्रवाशांनी कोकण रेल्वेनेच पुढील प्रवास सुरू केला आहे.
- राकेश सिंग, स्थानकप्रमुख, खेड
- नेत्रावती एक्स्प्रेस
मांडवी एक्स्प्रेस
जनशताब्दी एक्स्प्रेस.
गणपती स्पेशल.
मांडवी एक्स्प्रेस.
डबलडेकर.
डबलडेकर.
सावंतवाडी-दिवा पॅसेंजर
दादर-सावंतवाडी मडगाव एक्स
दादर-रत्नागिरी पॅसेंजर
या प्रवाशांना खेड स्थानकात थांबवून ठेवलेल्या चंदीगढ- कोचुवेली एक्स्प्रेसमधून गोव्याकडे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यातील कोचुवेली एक्स्प्रेसचे दिल्लीकडील दिशेचे इंजिन याच गाडीला जोडून ती गोव्याकडे रवाना करण्यात आली़ खेड आणि वीर स्थानकात आलेल्या व जाणाऱ्या प्रवाशांची खेड, दापोली, चिपळूण आणि महाड तसेच माणगाव या आगारातील ५० एसटी बसेसमधून प्रवाशांची ये-जा करण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती खेड येथील रेल्वे स्थानकप्रमुख राकेश सिंग यांनी दिली आहे. ज्या प्रवाशांचे वातानुकूलीत आसन असेल, त्या प्रवाशाला पुढील प्रवासाकरिताही वातानुकूलित आसनावर बसूनच प्रवास करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. चंदीगढ-कोचुवेली एक्स्प्रेस आणि गोवा क्रांती एक्स्प्रेस या दोन्ही गाड्यांना प्रत्येकी२४ बोगी आहेत. त्यामुळे प्रवाशांची पुरेशी व्यवस्था झाली. मात्र ऐन गणेशोत्सवात ही घटना घडल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला होता.