माकडांचा उपद्रव रोखण्यासाठी कोकण रेल्वेने काढली निविदा, विद्युतीकरणासाठी उभारलेले पोर्टल्स, मास्टर्सचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 04:43 PM2023-03-20T16:43:33+5:302023-03-20T16:43:59+5:30
विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या प्रवासात यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यत्यय
रत्नागिरी : विद्युतीकरणासाठी उभारलेले पोर्टल्स, मास्टर्स यांना माकडांचा उपद्रव हाेऊ लागला आहे. त्यामुळे अनेकवेळा अडचणी निर्माण हाेत आहेत. माकडांचा उपद्रव रोखून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कोकण रेल्वेने ६ लाख ६२ हजार ६६३ रुपये अंदाजित खर्चाची निविदा काढली आहे.
कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण करण्यात आले. कोकण रेल्वेच्या पूर्ण झालेल्या विद्युतीकरण मार्गावर विद्युत इंजिनासह गाड्यादेखील धावू लागल्या आहेत. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी ते राजापूर विभागातील ओएचई पोर्टल्स, मास्टर्स यावर माकडे चढून उड्या मारू लागली आहेत. विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या प्रवासात यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यत्यय निर्माण होऊ लागला आहे. ही माकडे रेल्वे गाड्यांवरून चालत आहेत. रेल्वेच्या ओव्हरहेड वायरमधून अतिउच्च क्षमतेचा विद्युत प्रवाह सुरू आहे.
रत्नागिरी ते राजापूर या टप्प्यात माकडांचा वाढलेला उपद्रव कोकण रेल्वेसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे वाहतुकीत अडचण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माकडांमुळे रेल्वेच्या विद्युत प्रवाहात खंड पडू नये, वाहतूक सुरळीत रहावी, यासाठी कोकण रेल्वेने निविदा प्रसिद्ध केली आहे. कोकण रेल्वेच्या माकडप्रवण भागात त्यांना रोखण्यासाठी अँटी क्लाइबिंग उपकरणे बसवावी लागणार आहेत.