‘रो रो सेवे’तून कोकण रेल्वेला मिळाले ३३ कोटींचे उत्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 06:05 PM2024-04-25T18:05:00+5:302024-04-25T18:05:27+5:30
प्रदूषणमुक्त, इंधन, वेळेची बचत करणारी जलद सेवा; मालवाहतूकदारांकडून अधिक पसंती
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर मालवाहतूक करणाऱ्या ट्रकची वाहतूक करणारी रो रो सेवा आर्थिक उत्पन्नाचा कणा ठरत आहे. गेल्या वर्षभरात या सेवेतून कोकण रेल्वे प्रशासनाला तब्बल ३२ कोटी ९८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. २६ जानेवारी १९९९ सालापासून सुरू असलेली ही सेवा कोकण रेल्वेच्या उत्पन्नात लक्षणीय भर टाकत आहे.
बीआरएन वॅगनवर ट्रक्सचा ‘रोल-ऑन रोल-ऑफ’ करण्याचा कोकण रेल्वेचा अनोखा प्रयोग यशस्वी ठरला आहे. या व्यवस्थेत ट्रक बीआरएन वॅगन्सवर लूपच्या टोकापर्यंत असलेल्या रॅम्पद्वारे वर चढविले जातात. केले जातात. या ट्रकना पुढे जाण्याच्या दृष्टीनेही योग्यरीत्या सुविधा दिली जाते. बीआरएन वॅगन्सवर चढविण्यापूर्वी, ट्रकचे वजन केले जाते. एवढेच नव्हे तर ट्रकचालक आणि क्लीनर त्यांच्या ट्रकच्या केबिनमध्ये झोपून प्रवास करू शकतात.
रो रो सेवा अर्थात रोल ऑन-रोल ऑफ सेवेमुळे मालवाहतुकीच्या क्षेत्रात कोकण रेल्वेने अभिनव यशस्वी उपक्रम उभारून उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण केला आहे. अनेक ट्रकची वाहतूक साखळीपद्धतीने एकाच वेळी होत असल्याने कोकण रेल्वेची ही कामगिरी लोकप्रिय झाली आहे. यात ३ रँकद्वारे सेवा दिली जात असून, एका रँकमध्ये ५० ट्रक सहजगत्या राहू शकतील, अशी व्यवस्था असते. मात्र, त्यासाठी ट्रकची उंची रस्त्यापासून जास्तीत जास्त ३.४ मीटर असल्याचीही खात्री केली जाते. त्यानंतरच वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली जाते.
अवघ्या १२ तासांत सुमारे १५० ट्रकचालक आणि त्याच्या सहकाऱ्यासह अवघ्या १२ तासांत इच्छित स्थळी पोहोचतात. गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेली रो रो सेवेमुळे गेल्या ३ वर्षांत कोकण रेल्वेला जवळपास २०० कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळवून दिले आहे. गेल्या आर्थिक वर्षात कोकण रेल्वेला ३२ कोटी ९८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
जकात वाचते
सध्या कोकण रेल्वेची रो रो सेवा कोलाड (मुंबईपासून १४५ किलोमीटर) ते वेर्णा (मडगावपासून १२ किलोमीटर), वेर्णा ते सुरतकल (मंगळूरपासून २० किलाेमीटर) आणि कोलाड ते सुरतकल अशी होत आहे. या सेवेवर जकात किंवा टाेल द्यावा लागत नाही. तसेच अपघाताचाही धोका नाही.
प्रदूषणमुक्त सेवा
रो रो सेवेत सर्व ट्रक रस्त्यावर धावत नसल्याने ही सेवा जलद आणि प्रदूषणमुक्त आहे. तसेच प्रवासादरम्यान ट्रकचीही कोणती हानी किंवा नुकसान होत नाही. इंधनाबरोबरच वेळेची बचत, दूर पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या चालकांसाठी सुखकारक प्रवास या सर्व कारणांमुळे मालवाहतूकदारांच्या नफ्यातही वाढ होते.