कोकण रेल्वे : रेल्वे तिकीट आरक्षणाला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 03:26 PM2019-03-21T15:26:49+5:302019-03-21T15:29:11+5:30
दहावी, बारावीच्या परीक्षा येत्या २२ मार्चला संपणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा ओढा आता कोकणातील त्यांच्या गावाकडे आहे. त्यासाठी कोकण रेल्वेने उन्हाळी हंगामाकरिता मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेच्या सहाय्याने ५२ जादा रेल्वे फेऱ्यांचे नियोजन केले आहे. या गाड्यांच्या आरक्षणाला १६ मार्चपासून सुरूवातही झाली आहे.
रत्नागिरी : दहावी, बारावीच्या परीक्षा येत्या २२ मार्चला संपणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा ओढा आता कोकणातील त्यांच्या गावाकडे आहे. त्यासाठी कोकण रेल्वेने उन्हाळी हंगामाकरिता मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेच्या सहाय्याने ५२ जादा रेल्वे फेऱ्यांचे नियोजन केले आहे. या गाड्यांच्या आरक्षणाला १६ मार्चपासून सुरूवातही झाली आहे.
गेल्या काही वर्षात कोकण रेल्वे ही कोकणवासीयांची जीवन वाहिनी बनली आहे. सण असो वा उन्हाळी हंगाम असो या कालावधीत प्रवाशांच्या होणाऱ्या गर्दीला सामावून घेण्यासाठी कोकण रेल्वे नेहमीच सज्ज असते.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार उन्हाळी हंगामात कोकणवासीयांना प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी विशेष गाड्यांचे हे नियोजन आहे. त्याअंतर्गत क्रमांक ०१०५१चे लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी साप्ताहिक रेल्वे गाडीच्या ८ विशेष फेऱ्या सोडल्या जाणार आहेत.
१७ मे २०१९ ते ७ जून २०१९ या काळात ही गाडी मार्गावरून धावणार आहे. दर शुक्रवारी रात्री ८.४५ वाजता ०१०५१ नंबरची रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणार आहे तर करमाळी येथून परतीची ०१०५२ क्रमांकाची रेल्वे १९ मे ते २० जून दरम्यान दर रविवारी दुपारी १२.५० वाजता मुंबईकडे रवाना होणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी साप्ताहिक रेल्वे क्रमांक ०१०४५/०१०४६च्या १८ फेऱ्या १२ एप्रिल ते ७ जून दरम्यान होणार आहेत. यातील ०१०४५ ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२ एप्रिल २०१९पासून दर शुक्रवारी रात्री १.१० वाजता सुटणार आहे. तर परतीची ०१०४६ ही गाडी करमाळी येथून १८ मे ते ८ जून या काळात दर शुक्रवारी दुपारी १२.५० वाजता मुंबईकडे रवाना होणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी व करमाळी ते लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक क्रमांक ०१०१५/०१०१६ या फेºया १८ मे ते १९ जून या काळात मार्गावर धावणार आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड व सावंतवाडी ते लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे क्रमांक ०१०३७/०१०३८च्या फेऱ्या कोकण रेल्वे मार्गावर ८ एप्रिल ते ६ जून २०१९ या काळात होणार आहेत. कोकणात येणाऱ्यांची संख्या मार्च महिन्याच्या अखेरीपासून वाढणार असल्याने कोकण रेल्वेने हे नियोजन केले आहे.
दरम्यान, १२०५१/१२०५२ दादर-मडगाव-दादर जनशताब्दी एक्सप्रेसला पावसाळ्यात १० जून ते ३१ आॅक्टोबर या काळात विस्टा डोम कोच जोडल्या जाणार आहेत.
कोकणात गणेशोत्सवासाठीही येणाऱ्या भक्तांची संख्या खूप मोठी आहे. या उत्सवासाठी येणाऱ्या भक्तांना रेल्वे आरक्षणाची सोय चार महिने आधी उपलब्ध करून दिली जाते. यावेळी एप्रिलच्या उत्तरार्धात गणेशोत्सवासाठीच्या गाड्यांचे आरक्षण सुरू होणार आहे. त्यासाठीही कोकण रेल्वेकडून आतापासूनच सज्जता ठेवण्यात येत आहे.