कोकण रेल्वे मार्ग आजही राहणार बंद; काही गाड्या रद्द
By मनोज मुळ्ये | Published: July 10, 2024 09:43 AM2024-07-10T09:43:37+5:302024-07-10T09:44:24+5:30
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मांडवी, तेजस तसेच जनशताब्दीसह आज बुधवारी धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी : गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोव्यातील पेडणे येथील रेल्वे बोगद्यामधून पाणी वाहत आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मांडवी, तेजस तसेच जनशताब्दीसह आज बुधवारी धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
कोकण रेल्वेच्या कारवार विभागामधील गोव्याच्या हद्दीत समाविष्ट असणाऱ्या मडुरे ते पेडणे दरम्यानच्या रेल्वेच्या भुयारी मार्गात पाणी वाहू लागले आहे. दिनांक ९ जुलै रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर सुरुवातीला काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मंगळवारी रात्री सव्वादहा वाजता ट्रॅक फिटनेस सर्टिफिकेट मिळाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र मुसळधार पावसामुळे आजही दिनांक १० जुलै २०२४ रोजी पहाटे २:५९ वाजण्याच्या सुमारास पेडणे बोगद्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी येऊ लागल्याने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून कोकण रेल्वेनकडून या मार्गाने धावणाऱ्या काही गाड्या रद्द केल्या आहेत.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
वंदे भारत एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, सावंतवाडी पॅसेंजर, तेजस एक्स्प्रेस, दिवा एक्स्प्रेस आणि मंगळुरू एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मंगला एक्स्प्रेसचा मार्ग बदलून तो पनवेल- लोणावळा – पुणे -मिरज- लोंढा - मडगाव असा करण्यात आला आहे.