कोकण रेल्वे वेळापत्रक कोलमडलेलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 10:18 PM2019-08-09T22:18:52+5:302019-08-09T22:19:06+5:30
शुक्रवारी मुंबई - मडगावदरम्यान रेल्वे गाड्या १ ते ६ तास उशिराने धावत आहेत.
रत्नागिरी : मुसळधार पावसाने सर्वांचीच भंबेरी उडवून दिलेली असताना जिल्ह्यातील रस्ते वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. या स्थितीत कोकण रेल्वेने कोकणवासियांना चांगली साथ दिली आहे. मात्र, कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक शुक्रवारीही बिघडलेलेच होते. बिघडलेले हे वेळापत्रक पूर्ववत होण्यास पुढील आठवडा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शुक्रवारी मुंबई - मडगावदरम्यान रेल्वे गाड्या १ ते ६ तास उशिराने धावत आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या २ ते ३० तास उशिराने धावत आहेत. मुंबईच्या दिशेने जाणारी १२४८३ कोचुवेली एक्स्प्रेस ३०.१४ तास, २२११४ कोचुवेली एक्स्प्रेस १२.४५ तास, तर गरीबरथ एक्स्प्रेस ९.१८ तास उशिराने धावत होती. नेत्रावती ६.१३, तेजस एक्स्प्रेस २.०६, राजधानी एक्स्प्रेस ३.४१, मांडवी एक्स्प्रेस १.४० तास उशिराने धावत होत्या.
मुंबईहून मडगावच्या दिशेने धावणाऱ्या अनेक गाड्यांचे वेळापत्रकही बिघडले आहे. मडगावच्या दिशेने जाणारी मंगळुरू जंक्शन एक्स्प्रेस ८.२६ तास, जनशताब्दी एक्स्प्रेस १.०३ तास, १९२६६ कोचुवेली एक्स्प्रेस ३३ मिनिटे, १६३४५ नेत्रावती एक्स्प्रेस १ तास, १०१०३ मांडवी एक्स्प्रेस ५.१६ तास उशिराने धावत होत्या.
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या उशिराने धावत असल्या तरी बहुतांश प्रवाशांना कोकण रेल्वेच्या कोकण रेल्वे साईटवरील अपडेट्समुळे रेल्वे स्थानकात जास्त वेळ ताटकळावे लागत नसल्याचेही चित्र आहे. अपडेट्स पाहूनच अनेक प्रवासी त्या वेळेनुसार रेल्वे स्थानकात गाडीसाठी येत आहेत. मात्र, तरीही अनेक प्रवाशांना गाड्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. दुसरीकडे गाड्यांना उशिर होत असल्याने गाड्यांमध्ये असलेल्या प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ वाढत असून, प्रवास कंटाळवाणा होत असल्याच्या प्रतिक्रियाही येत आहेत.