कोकण रेल्वेचे ज्वालाग्राही पदार्थविरोधी अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:31 AM2021-03-31T04:31:49+5:302021-03-31T04:31:49+5:30
देशात गेल्या काही दिवसांत ट्रेनमध्ये आग लागण्याच्या घटना विविध ठिकाणी घडल्या आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण ...
देशात गेल्या काही दिवसांत ट्रेनमध्ये आग लागण्याच्या घटना विविध ठिकाणी घडल्या आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी कोकण रेल्वेने एक विशेष अभियान हाती घेतले आहे. गेल्या दहा दिवसांत कोकण रेल्वेने रेल्वेतून ज्वालाग्राही पदार्थ घेऊन जाणाऱ्या मंडळींसह रेल्वे आणि स्थानक परिसरात धूम्रपान करणाऱ्या मंडळींविरोधात धडक मोहीम राबवली आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांची या अंतर्गत तपासणी करण्यात आली आहे.
कोकण रेल्वेने केवळ प्रवाशांचीच तपासणी केली नाहीतर रेल्वेच्या भोजन कक्षापासून विविध ठिकाणी आगीस कारण ठरणाऱ्या गोष्टी असणार नाहीत याची कसून तपासणी केली आहे. कोकण रेल्वेतून होणारा प्रवास हा पूर्णतः सुरक्षित असावा यासाठी ही मोहीम राबवली गेली आहे.
अनेक वेळा रेल्वेतून प्रवास करणारी मंडळी धूम्रपान करून पेटती सिगारेट-काडेपेटी बाहेर फेकून देतात. यातून मार्गानजीक आग लागण्याची शक्यता असते. यासाठी कोकण रेल्वेच्या विविध स्थानकांवर या संबंधातील घोषणा वारंवार केल्या जात आहेत. गेले दहा दिवस सुरू असलेल्या या अभियानात कोकण रेल्वेचे विविध स्तरातील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. या पुढील काळातही सुरक्षिततेच्या या उपाययोजना सुरू राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी कोकण रेल्वेच्या मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांमध्ये यापुढेही प्रवाशांची तपासणी सुरू राहील, असे कोकण रेल्वेने सांगितले आहे.