मोबाईल अॅपव्दारे मीटर रिंडिंगमध्ये कोकण पिछाडीवर
By admin | Published: September 6, 2016 10:50 PM2016-09-06T22:50:35+5:302016-09-06T23:43:27+5:30
महावितरण कंपनी : पुणे विभाग आघाडीवर, राज्यात ६ लाख ५४ हजार २१५ मीटरचे रिडिंग
मेहरुन नाकाडे ---रत्नागिरी --घरबसल्या वीजबिल भरता यावे, त्याचबरोबर नवीन जोडणीच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयात ग्राहकांना जाण्याची गरज उरली नाही. शिवाय महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मीटरचे रिडिंग घेण्यासाठी ग्राहकांच्या दारात जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही. महावितरणने तयार केलेल्या अॅपव्दारे दोन्ही गोष्टी शक्य झाल्या आहेत. महावितरणने तयार केलेल्या अॅपव्दारे राज्यात एकूण ६ लाख ५४ हजार २१५ मीटरचे रिडिंग घेण्यात आले आहे. महावितरणच्या सर्व विभागांमध्ये मीटर रिडिंग घेण्यात पुणे विभाग अव्वल असला तरी कोकण मात्र पिछाडीवर आहे.
महावितरण कंपनीने तयार केलेल्या मोबाईल अॅपमध्ये सरासरी वीजबिल टाळण्यासाठी मीटरचा फोटो व रिडिंग पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. नवीन वीज जोडणीसाठी अर्ज नोंदणी करता येते. वीजबिलाचा तपशील मोबाईल अॅपव्दारे घेता येतो. तसेच नेट बँकिंग, क्रेडिट - डेबिट कार्ड, मोबाईल वॉलेट, कॅशकार्डव्दारे बिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. विजेसंबंधी तक्रार नोंदणी ग्राहकास अॅपव्दारे करता येते, त्याचप्रमाणे तक्रारीचा पाठपुरावाही करता येतो. मागील देयकांचा तपशील व देयके भरणा केल्याच्या पावत्याही उपलब्ध होतात. याशिवाय महावितरणच्या इतरही सेवांबद्दल ग्राहकास आपला अभिप्राय नोंदवता येऊ शकतो.
महावितरणच्या ६६६.ेंँं्िर२ूङ्मे.्रल्ल या संंकेतस्थळावर गुगल प्लेमधून अॅप डाऊनलोड करता येते. आयओएस अॅप्लीकेशन डाऊनलोड केल्यानंतर विविध सुविधांचा लाभ घेता येऊ शकतो. राज्यात २ कोटी ३१ लाख ५ हजार ९९५ ग्राहक आहेत. पैकी ४ लाख ३५ हजार १०८ ग्राहकांनी मोबाईल अॅप सेवेचा लाभ घेतला आहे. मोबाईल अॅपव्दारे ८ हजार ६३९ फीडरबाबत माहिती घेण्यात आली आहे. वीजपुरवठा स्थलांतर २ हजार ५२ ग्राहकांचे करण्यात आले असून, तांत्रिक सुविधा १ हजार ९२ ग्राहकांना देण्यात आल्या आहेत. नवीन जोडण्या ६ हजार ४५७ तसेच विजेच्या १० जोडण्या अॅपव्दारे तोडण्यात आल्या आहेत.
मोबाईल अॅप सेवेचा लाभ घेण्यात पुणे विभागाचा प्रथम क्रमांक लागतो. पुणे विभागात महावितरणचे एकूण २५ लाख ४ हजार २५९ ग्राहक असून, १ लाख ७९ हजार ८२५ ग्राहकाच्या मीटरचे रिडिंग मोबाईल अॅपव्दारे घेण्यात आले आहे. कल्याण झोनमध्ये २५ लाख ७३ हजार ४८७ ग्राहक असून, एक लाख ७९ हजार ३७३, नागपूर विभागात १० लाख १६ हजार ९७४ ग्राहक असून, १ लाख ९५०, अकोला विभागात ११ लाख ४३ हजार ८८५ ग्राहक असून, ३७ हजार ९६१ मीटरचे रिडिंग अॅपव्दारे घेण्यात आले आहे. बारामती विभागात २३ लाख २६ हजार ७२ ग्राहकांपैकी ३४ हजार ५१७, भांडूप विभागात एकूण १६ लाख ५५ हजार ३५ ग्राहक असून, ३२ हजार २८०, चंद्रपूरमध्ये ६ लाख ६४ हजार ९४६ ग्राहकांपैकी २५ हजार ५५७, कोल्हापूर विभागात १७ लाख ९८ हजार ९२१ ग्राहकांपैकी २० हजार ६१९ ग्राहकांच्या मीटरचे रिडिंग घेण्यात आले आहे. नाशिक विभागात २२ लाख ९४ हजार ४३३ ग्राहकांपैकी १८ हजार १९६, अमरावती विभागात ११ लाख ४६ हजार ७२४ ग्राहक असून, १० हजार ७५४, नांदेड विभागातील ९ लाख ८९ हजार ३५१ ग्राहकांपैकी ४ हजार ५२६, जळगाव विभागात १३ लाख ९० हजार ८७ ग्राहकांपैकी ३ हजार ३८१, गोंदिया विभागात ५ लाख ४६ हजार ७२४ ग्राहकांपैकी २ हजार २९२, औरंगाबादमध्ये १० लाख ९० हजार ८२५ ग्राहक असून, २ हजार १८५, लातूर विभागात १२ लाख १६ हजार ७५ ग्राहक असून, १ हजार ३२४ ग्राहकांच्या मीटरचे रिडिंग घेण्यात आले आहे. कोकण विभागात ७ लाख ९३ हजार १५ ग्राहक असून, केवळ ४७५ ग्राहकांचे मीटर रिडिंग अॅपव्दारे घेण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व विभागांचा विचार करता कोकण विभाग मीटरच्या रिडिंगमध्ये पिछाडीवर आहे. भविष्यात मीटर रिडिंगमध्ये कोकण विभागाचा पहिल्या पाचमध्ये क्रमांक असावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
मोबाईल अॅप ग्राहकांनी डाऊनलोड केल्यानंतर विजेसंबधी तक्रारी, नवीन जोडण्या, सरासरी वीजबिल टाळण्यासाठी मीटरचा फोटो व रिडिंग पाठविण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध होते. शिवाय आॅनलाईन तक्रारी असल्यामुळे महावितरणलादेखील कोणतीही सबब सांगण्याची आवश्यकता नाही. महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांना मोबाईल अॅपचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. मोबाईल अॅपमुळे भविष्यात लाईनस्टाफला ग्राहकांच्या दारात जाऊन पैसे भरले का ? विचारण्याची आवश्यकता भासणार नाही. सध्या कोकण विभागाचा मोबाईल अॅप वापरात सातवा क्रमांक लागत असला तरी भविष्यात मोबाईल अॅप वापरणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. कोकणवासीय ‘स्मार्ट सेवेचा’ वापर प्राधान्याने करीत असल्याने मोबाईल अॅप वापरात नक्कीच कोकण अग्रेसर असेल.
- पी. एस. पाटील
मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, प्रकाशगड-मुंबई.
मोबाईल अॅपव्दारे प्रथम वीज जोडणी घेण्याचा मान गोंदिया विभागातील एका शिक्षिकेने घेतला आहे. मोबाईल अॅप डाऊनलोड केल्यावर तिने केलेल्या वीजजोडणी अर्जाची तत्काळ दखल घेत महावितरण कंपनीने एका दिवसात वीज जोडणी देऊ केली आहे. झटपट वीज जोडणी मिळविण्यासाठी ग्राहकांना मोबाईल अॅप नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.