कोकणकन्या, मांडवी एक्सप्रेसला पावसाळ्यात नवा साजश्रुंगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 11:47 AM2019-05-04T11:47:09+5:302019-05-04T11:48:59+5:30
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या कोकणकन्या व मांडवी एक्सप्रेस गाड्यांचे रुपडे पावसाळ्यात बदलणार आहे. निळ्या रंगाऐवजी लाल व करड्या रंगाचा साज श्रुंगार करून या दोन्ही गाड्या १० जून ते ३१ आॅगस्ट २०१९ दरम्यान कोकण रेल्वे मार्गावरून धावणार आहेत.
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या कोकणकन्या व मांडवी एक्सप्रेस गाड्यांचे रुपडे पावसाळ्यात बदलणार आहे. निळ्या रंगाऐवजी लाल व करड्या रंगाचा साज श्रुंगार करून या दोन्ही गाड्या १० जून ते ३१ आॅगस्ट २०१९ दरम्यान कोकण रेल्वे मार्गावरून धावणार आहेत. त्यामुळे भर पावसाळ्यात निसर्गाने हिरवा शालू नेसलेला असताना त्यामधून या लाल व करड्या रंगाच्या साजश्रुंगारातील गाड्याचे रुप अधिकच खुलणार आहे.
कोकण रेल्वेने या दोन्ही एक्सप्रेस गाड्यांचे रुप पावसाळ्यात बदलण्याचे ठरविले आहे. आधीच्या निळ्या रंगातील इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नाईच्या या गाड्यांच्या बोगीऐवजी आता प्रवासी क्षमता अधिक असलेल्या व लाल-करड्या रंगातील लिके होल्फमन बूश बोगी जोडल्या जाणार आहेत. या गाड्यांमध्ये अत्याधुनिक प्रसाधनगृहे, आरामदायी बैठक व्यवस्था असेल.
एलएचबी डब्यांच्या शयनयान बोगींमध्ये ७२ ऐवजी ८० प्रवासी झोपू शकणार आहेत. एसी थ्री टायर श्रेणीतील बी १ ते बी ५ या बोगींमधील प्रवासी क्षमताही ६४ ऐवजी ७२ होणार आहे. एसी २ टायरमध्ये ५४ व एचए १ मध्ये २४ प्रवासी क्षमता असेल. त्यामुळे कोकणकन्यामध्ये १२४ तर मांडवी एक्सप्रेसमध्ये ९४ प्रवासी क्षमता वाढणार आहे.
एलएचबी बोगी या अॅण्टी टेलिस्कोपिक पध्दतीच्या असून अपघातात या बोगी उलटणार नाहीत. स्टील बॉडी असल्याने अपघाताच्यावेळी डबा फाटलाच तर पत्रा आत न वळता बाहेरच्या बाजुला वळेल व प्रवाशांना इजा होणार नाही.
कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक १० जूनपासून सुरू होणार आहे. त्याच दिवसांपासून या नवीन रुपातील दोन्ही गाड्या सुरू होणार असून ३० आॅगस्टपर्यंत त्या प्रायोगिक असतील तर नंतर त्या नियमित होतील.