वंदे भारतची कोकणवासियांना उत्सुकता; पण ओडिशातील भीषण अपघाताने मन विषण्ण
By मेहरून नाकाडे | Published: June 3, 2023 07:22 PM2023-06-03T19:22:12+5:302023-06-03T19:22:40+5:30
ओडिशातील दुर्दैवी अपघातामुळे मडगाव-कोकण रेल्वेमार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसचा नियोजित उद्घाटन सोहळा रद्द
रत्नागिरी : ओडिशातील दुर्दैवी अपघातामुळे मडगाव - कोकण रेल्वेमार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसचा शनिवारी (दि. ३) नियोजित असलेला उद्घाटन सोहळा रद्द झाला आहे. काही दिवसांपूर्वी कोकण रेल्वेमार्गावर या गाडीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर सर्वांना ही गाडी सुरू होण्याची उत्सुकता लागून राहिली होती; मात्र या भीषण अपघातामुळे सर्वांचंच मन विषण्ण झालं आहे, अशी प्रतिक्रिया या गाडीतून पहिला प्रवास करण्यासाठी विशेष निमंत्रित म्हणून मडगाव येथे उपस्थित असलेले रत्नागिरीचे सेवानिवृत्त प्राध्यापक उदय बोडस यांनी व्यक्त केली आहे.
तीन जून रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत कोकण रेल्वेमार्गावरची पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मडगाववरून छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाण्यासाठी सुटणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार होते. ज्या ठिकाणी ती गाडी थांबणार होती, त्या प्रत्येक स्टेशनवरही गाडीच्या स्वागताची जंगी तयारी झाली होती. या पहिल्या गाडीतून प्रवास करण्यासाठी काही रेल्वे फॅन्स, तसेच पत्रकार मडगावमध्ये दाखल झाले होते. रत्नागिरीतील सेवानिवृत्त प्राध्यापक उदय बोडस हेदेखील विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. त्यांनी आतापर्यंत कोकण रेल्वेमार्गावरच्या २२ नव्या गाड्यांतून पहिला प्रवास केला आहे.
वंदे भारतसारखी आधुनिक रेल्वे कोकण रेल्वेमार्गावर येत असल्याचा जो उत्साह होता, तो शुक्रवारी ओडिशात झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे एका क्षणात मावळला आहे. आता सगळे कर्तव्य म्हणून काम करत आहेत; पण कोणातच उत्साह दिसत नाही. वंदे भारत एक्स्प्रेस गाडी रिकामीच शुक्रवारी रात्री मुंबईला रवाना झाली.
कोकण रेल्वेच्या १९९६ च्या उद्घाटनाच्या प्रवासापासून अलीकडच्या तेजस एक्स्प्रेसपर्यंतच्या प्रत्येक पहिल्या गाडीने प्रा. बोडस यांनी प्रवास केला आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस एलचएबी डब्यांसह धावू लागली, तेव्हा कोरोना निर्बंधांमुळे मला त्या गाडीतून जाता आलं नाही. त्यानंतर सुरू झालेल्या बुधाना ते मंगळुरू जंक्शन आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते कन्याकुमारी या दोन गाड्यांमधून त्यांनी केलेले प्रवास अनुक्रमे २१ आणि २२वे होते. वंदे भारत एक्स्प्रेसमधला प्रवास २३ वा ठरला असता; मात्र दुर्दैवाने तो योग आला नाही, अशी प्रतिक्रियाही बोडस यांनी व्यक्त केली.
दरम्यान, कोकण रेल्वेमार्गावरच्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनाची पुढील तारीख निश्चित झाल्यावर जाहीर केली जाईल, असे कोकण रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.