कोत्रेवाडीचे नागरिक उच्च न्यायालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:20 AM2021-07-22T04:20:26+5:302021-07-22T04:20:26+5:30
लांजा : शहरातील कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राऊंडला नागरिकांचा ...
लांजा : शहरातील कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राऊंडला नागरिकांचा विरोध असतानाही नगर पंचायतीच्या विशेष सभेत ठराव करण्यात आला. त्यामुळे नगर पंचायतीविरोधात कोत्रेवाडीतील नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे.
लांजा नगर पंचायतीच्यावतीने कोत्रेवाडी येथे डम्पिंग ग्राऊंड प्रकल्प प्रस्तावित आहे. हा प्रकल्प लोकवस्तीपासून अगदी जवळ म्हणजे १८० मीटर इतक्या अंतरावर असून, आजूबाजूला येथील नागरिकांच्या पाण्याच्या विहिरी आहेत. मात्र, असे असतानाही याठिकाणी हा प्रकल्प राबविण्यासाठी नगर पंचायत प्रयत्नशील असल्याने अगदी सुरुवातीपासूनच कोत्रेवाडी येथील नागरिकांनी या प्रस्तावित प्रकल्पाला जोरदार विरोध केला होता. हा टोकाचा विरोध लक्षात घेऊनही लांजा नगर पंचायतीच्या विशेष सभेत सत्ताधारी शिवसेनेने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर केला आहे.
या प्रकल्पाकडे जाण्यासाठी रस्ता नसतानाही डम्पिंग ग्राऊंड प्रकल्प रेटून नेण्यासाठी नगर पंचायत प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेचा प्रयत्न हा अनाकलनीय असल्याचे येथील नागरिकांनी म्हटले आहे. या प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध असतानाही नगर पंचायतीचा याठिकाणीच प्रकल्प करण्यासाठी अट्टाहास का? असा प्रश्न करत नागरिकांनी आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. लांजा नगर पंचायतीच्या या निर्णयाविरोधात कोत्रेवाडीतील नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले असून, नगर पंचायतीच्या ठरावाला आव्हान दिले आहे.