हातीवले महाविद्यालयात सुरू होणार कोविड केअर सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:23 AM2021-06-03T04:23:04+5:302021-06-03T04:23:04+5:30
राजापूर : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, आमदार प्रसाद लाड व भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांच्या पुढाकारातून राजापूर ...
राजापूर : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, आमदार प्रसाद लाड व भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांच्या पुढाकारातून राजापूर तालुक्यात हातीवले येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात नवीन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या कोविड केअर सेंटरच्या जागेची बुधवारी भाजप तालुकाध्यक्ष अभिजित गुरव व भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रशासनासोबत पाहणी केली.
राजापूर तालुक्यात गेले काही दिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या प्रशासनाकडून रायपाटण व धारतळे येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. ओणी येथे २५ बेडचे कोविड रुग्णालय तर रायपाटण ग्रामीण रुग्णालयात ४५ ऑक्सिजन बेडचे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे; मात्र भविष्यात रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन व होम आयसोलेशन बंद करण्यात आल्याने रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून आणखी काही ठिकाणी कोविड रुग्णालये सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. राजापूर तालुक्यात प्रशासनाला अशा प्रकारे कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी भाजप सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही भाजपाच्या वतीने देण्यात आली होती.
आता राजापूर शहरापासून जवळ असलेल्या हातीवले येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्यासाठी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी निधी देण्याचे तर माजी खासदार नीलेश राणे यांनी आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा देण्याचे आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी बनसोडे व तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. बुधवारी भाजप तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, अॅड. सुशांत पवार, मोहन घुमे, अरविंद लांजेकर यांनी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. याप्रसंगी हातीवले तलाठी सुरेश डकरे, विखारे गोठणे, पोलीस पाटील संजय पावसकर, महाविद्यालयाचे संतोष मयेकर आदी उपस्थित होते.