चिपळूण नगरपरिषदेचे कोविड सेंटर सुरू करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:31 AM2021-04-21T04:31:41+5:302021-04-21T04:31:41+5:30
चिपळूण : नगरपरिषद कोविडचा सुमारे ३५ लाखाचा निधी पडून आहे. मात्र अजूनही चिपळूण नगरपरिषदेने कोविडसंदर्भात कोणतीही उपाययोजना केलेली नाही. ...
चिपळूण : नगरपरिषद कोविडचा सुमारे ३५ लाखाचा निधी पडून आहे. मात्र अजूनही चिपळूण नगरपरिषदेने कोविडसंदर्भात कोणतीही उपाययोजना केलेली नाही. या ३५ लाखांमध्ये पालिकेने मुख्याधिकारी यांनी त्वरित कोविड सेंटर सुरू करावे व ॲम्ब्युलन्स घ्यावी, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
चिपळूण दौऱ्यावर आलेल्या आमदार सामंत यांच्या उपस्थितीत डीबीजे महाविद्यालयामध्ये कोरोनाविषयीच्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक होती. या बैठकीला आमदार शेखर निकम यांच्यासह तहसीलदार जयराज सूर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सानप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव, तसेच मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी व अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी सामंत यांनी तालुक्याच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, चिपळूणमध्ये कामथे उपजिल्हा रुग्णालयात आणखी तीस बेड वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच व्हेंटिलेटर्स बेडची संख्याही वाढवण्यात येणार आहेत. लसीच्या वाटपात सुसूत्रता आणण्याबाबतही सामंत यांनी मान्य केले. ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू नये, म्हणून कामथे उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे कामही सुरू करण्यात येईल, असे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे सांगतानाच जर असे कोणी आढळून आले, तर त्यांची वाहने जप्त करण्यात येतील व तशा सूचना पोलिसांना देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय कोरोनाबाधित रुग्ण व गृहविलगीकरणात जे आहेत, त्यांना शिक्के मारण्यासाठी मोहीम त्वरित सुरू करण्यात येणार आहे. पेढांबे येथील कोविड सेंटर मंगळवारपासून सुरू करण्यात आले असल्याची माहिती यावेळी सामंत यांनी दिली.