चिपळुणात मदरसामध्ये उभारले कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:32 AM2021-04-27T04:32:13+5:302021-04-27T04:32:13+5:30
चिपळूण : कोरोना महामारीत शहरातील मुस्लिम समाज पुन्हा एकदा पुढे आला असून, येथील मुस्लिम मदरसाची इमारत त्यांनी कोविड केअर ...
चिपळूण : कोरोना महामारीत शहरातील मुस्लिम समाज पुन्हा एकदा पुढे आला असून, येथील मुस्लिम मदरसाची इमारत त्यांनी कोविड केअर सेंटरसाठी दिली आहे. तर येथील लाईफकेअर हॉस्पिटलने धाडस दाखवत हे कोविड सेंटर चालवण्याची जबाबदारी घेतली आहे. आमदार शेखर निकम यांच्या हस्ते या कोविड केअर सेंटरचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले.
तालुक्याला कोरोनाने घट्ट विळखा घातला आहे. दिवसेंदिवस हा विळखा अधिक घट्ट होत आहे. दररोज दुपटीने कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे तालुक्यातील हॉस्पिटल हाऊसफुल्ल झाले असून आरोग्य सेवाही अपुऱ्या पडत आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य सेवा वाढवण्याकडे प्रशासनाने लक्ष दिले आहे. स्थानिकांच्या साहाय्याने कोविड केअर सेंटर तसेच आयसोलेशन सेंटर सुरू करण्यावर भर देण्यात येत असून त्याची सुरुवातही करण्यात आली आहे.
चिपळुणातील लाईफकेअर हॉस्पिटलने यापूर्वीच स्वतःचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. परंतु आता हे कोविड सेंटर कमी पडू लागले आहे. त्यानंतर लाईफकेअर हॉस्पिटलचे डॉ. समीर दळवी आणि डॉ. इसाक खतीब यांनी येथील मुस्लिम समाज संस्था सदस्य व मुस्लिम बांधवांना विश्वासात घेऊन येथील मुस्लिम मदरसाची इमारत कोविड सेंटरसाठी देण्याची विनंती केली होती.
तसेच आमदार निकम, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनीही मुस्लिम समाज बांधवांशी चर्चा केली आणि चिपळूण तालुका मुस्लिम समाज बांधवांनी सढळ हस्ते मदरसाची इमारत कोविड केअर सेंटरसाठी देण्याची तयारी दर्शवली होती. लाईफकेअर हॉस्पिटलकडून येथे सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर अन्य सुविधा चिपळूण मुस्लिम समाज तसेच अन्य सामाजिक संस्थांकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येथे १२ ऑक्सिजन बेडची सुविधा ठेवण्यात आली असून, १४ बेड हे जनरल आयसोलेशन असणार आहेत. तसेच व्हेंटिलेटर बॅकअपची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. उद्घाटन समारंभाला आमदार निकम यांच्यासोबत प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, तसेच चिपळूण मुस्लिम समाजाचे पदाधिकारी सदस्य आणि सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
..................................
चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथे कोविड सेंटरचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रवीण पवार, डॉ. ज्योती यादव व मुस्लिम समाज संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.