ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांची कोविड तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:29 AM2021-03-25T04:29:18+5:302021-03-25T04:29:18+5:30
राजापूर : कोरोनाची तपासणी करताना शहरी भागाला एक न्याय व ग्रामीण भागाला एक न्याय देण्यात येत असल्याचे ग्रामीण भागातील ...
राजापूर : कोरोनाची तपासणी करताना शहरी भागाला एक न्याय व ग्रामीण भागाला एक न्याय देण्यात येत असल्याचे ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आरोग्य प्रशासन ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांची कोरोना तपासणी करीत आहे. मात्र, राजापूर शहरातील व्यापाऱ्यांना वगळण्यात आले आहे.
एस. टी. अभावी प्रवाशांचे हाल
देवरुख : देवरुख आगाराची करजुवे-चिपळूण ही सकाळी ८.१५ वाजता सुटणारी गाडी बंद केल्यामुळे खाडी भागातील लोकांना याचा फटका बसत आहे. असंख्य रुग्ण या गाडीवर अवलंबून असतात. या गाडीने चिपळूणाला आले तर चिपळूणमधील चांगल्या आरोग्य सेवेचा लाभ रुग्णांना घेता येतो.
क्वॉलिटी कंट्रोलकडून होणार चौकशी
चिपळूण : चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागात अनेक कामे बोगस झाली आहेत. कार्यकारी अभियंता उत्तमकुमार मुळ्ये यांनी आपल्या मर्जीतील ठेकेदाराची आणि उपअभियंता, शाखा अभियंता व टेक्निकल असिस्टंटची एक साखळी तयार केली असून त्याआधारे अनेक कामांची खोटी बिले पारित केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कोरोनाबाबत जनजागृती
रत्नागिरी : केंद्र व राज्य शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय आणि नागरी उपजीविका अभियानांतर्गत महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या सुती मास्क विक्री केंद्राचा शुभारंभ नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांनी केला. यावेळी कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली.
पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण शिबिर
पाचल : राजापूर तालुक्यातील पाचल येथील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक केंद्र शाळा क्रमांक १ येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांसाठी पशुसंवर्धन विषयक तीन दिवशीय प्रशिक्षण शिबिर नुकतेच पार पडले.
पेट्रोलपंप सर्वांसाठी खुला
रत्नागिरी : एस. टी. महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी नवनवीन योजना हाती घेण्यात आल्या आहेत. एस. टी. आगारातील पेट्रोल पंप सर्वांसाठी खुले करण्याचा निर्णय परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी जाहीर केला आहे. आतापर्यंत केवळ एस. टी. गाड्यांसाठी पंपाचा उपयोग केला जात होता.
विकासकामांना २० लाखांचा निधी
राजापूर : आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली जैतापूरचे माजी सरपंच गिरीश करगुटकर यांनी शाखाप्रमुख संदीप शिवलकर यांच्यामार्फत पालकमंत्री अनिल परब यांच्याकडे काही विकासकामांना निधी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर राजापूरमधील ४ विकासकामांना २० लाखांचा निधी पालकमंत्र्यांनी मंजूर केला आहे.
विरार अर्नाळा एस. टी. सुरू
खेड : सामाजिक कार्यकर्ते एम. जी. उपानेकर यांच्या प्रयत्नाने रत्नागिरी विभागाची व खेड आगाराची खेड तुळशी, विन्हरे, महाड, पनवेल, ठाणे, नालासोपारा मार्गे विरार-अर्नाळा एस.टी. सेवा प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आली आहे. ही गाडी खेडवरून सकाळी ८.३० वाजता सोडण्यात आली.