रत्नागिरीला वापरून मगच मराठवाड्याला कोयना धरणाचे पाणी, पालकमंत्री उदय सामंत यांनी मांडली स्पष्ट भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 01:41 PM2024-08-03T13:41:43+5:302024-08-03T13:42:38+5:30
रत्नागिरी : कोयना अवजलाचा वापर कसा करावा, याबाबत पेंडसे समितीने दिलेल्या अहवालाचा तंतोतंत वापर करून मगच पाणी मराठवाड्याला दिले ...
रत्नागिरी : कोयना अवजलाचा वापर कसा करावा, याबाबत पेंडसे समितीने दिलेल्या अहवालाचा तंतोतंत वापर करून मगच पाणी मराठवाड्याला दिले जाईल, अशी भूमिका राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मांडली.
रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केले. समुद्राला जाऊन मिळणारे कोयना अवजल मराठवाड्याकडे नेण्याचा विषय काही काही काळाने चर्चेत येतो. जवळपास गेली २०-२५ वर्षे कोयना अवजलावर चर्चा होत आहे. कोयनामध्ये दरवर्षी १,९११ दशलक्ष घनमीटर इतके पाणी वीजनिर्मिती केल्यानंतर वाशिष्ठी नदीत सोडण्यात येते. वाशिष्ठी नदीतून हे पाणी समुद्राला जाऊन मिळते. हे पाणी मराठवाड्याला, मुंबईला देण्यावर तसेच ते जिल्ह्यासाठी वापरण्यावर अनेकदा चर्चा झाली आहे. मात्र, अजूनही त्यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
या विषयावर मंत्री सामंत म्हणाले की, १९९९ पासून कोयना अवजलाबाबत आपण अभ्यास करीत आहोत. आमदार झाल्यानंतर २००५ मध्ये याबाबत विधान परिषदेत पिटीशन दाखल केले होते. त्याला अनुसरून पेंडसे समिती नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला. या समितीने दिलेल्या अहवालातील शिफारशींचा तंतोतंत वापर करून कोयना अवजल प्रथम रत्नागिरी जिल्ह्यासाठी वापरले जाईल आणि त्यानंतर ते मराठवाड्याला दिले जाईल.
काय होता अहवाल?
-२७ सप्टेंबर २००६ रोजी या समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला.
-वीजनिर्मितीनंतर कसलाही उपयोग न होता समुद्राला जाऊन मिळणारे अवजल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिल्यास ११ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल आणि स्थानिक जनतेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल.
-या पाण्यामुळे पर्यटनवाढीला चालना मिळेल आणि त्यातून स्वयंरोजगारही उपलब्ध होईल.
-या पाण्यावर केवळ शेतीच नाही. तर लघू विद्युतनिर्मिती प्रकल्प, दूध डेअरी, फळ बागायत यालाही चालना मिळेल, असे या अहवालातून मांडण्यात आले आहे.