‘हाॅटमिक्स’ डांबरीकरणामुळे कुंभार्ली घाट साेयीस्कर, आता आरामात करा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 04:18 PM2022-06-07T16:18:13+5:302022-06-07T16:18:52+5:30
मागील झालेल्या अतिवृष्टीत कुंभार्ली घाटातील रस्त्याची दुरवस्था झाली होती
संदीप बांद्रे
चिपळूण : गेल्या अनेक वर्षांत प्रथमच चिपळूण तालुक्यातील संपूर्ण कुंभार्ली घाट चकाचक झाला आहे. मागील झालेल्या अतिवृष्टीत कुंभार्ली घाटातील रस्त्याची दुरवस्था झाली होती. या घाटातील सोनापात्र भागात रस्ता धोकादायक बनला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘हॉटमिक्स’ डांबरीकरण केल्याने प्रवास सोयीस्कर झाला आहे.
गुहागर-विजापूर मार्गावरील हा घाट कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडतो. १३ किलोमीटर लांबीच्या घाट रस्त्यात अनेक नागमोडी वळणे आहेत. पावसाळ्यात घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळतात. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात खबरदारी घेतली जाते. गतवर्षी मोठ्या दरडी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हटवण्यात आल्या. मात्र, अनेक ठिकाणी दरडींची माती नाल्यात गेल्याने ते बुजले होते. शिवाय वाढलेल्या झाडीमुळे रात्रीच्यावेळी समोरून येणारे वाहन आणि साईडपट्टी समजत नव्हती. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला होता.
पोफळीपासून काही अंतरावर असलेल्या सोनपात्राच्या ठिकाणी पूर्णतः रस्ता खचला होता. अनेकदा वाहने अडकून पडली होती. दोनवेळा पाच तास वाहतूक ठप्प झाली होती. तसेच अन्य ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले होते.
यावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दर्जेदार डांबरीकरण केले आहे. या डांबरीकरणासाठी घाट दोन दिवस बंद ठेवण्यात यावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. मात्र, जिल्हाधिकारी यांनी परवानगी नाकारली. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू ठेवूनच घाटात डांबरीकरण केले. तसेच हेलवाक, पाटण या भागातही डांबरीकरण झाल्याने चिपळूण ते कराडचा प्रवास प्रथमच सुखकर झाला आहे.
२५ फुटांतील खड्ड्यांची ओरड
चिपळूण ते कराडदरम्यान बहुतांशी ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच आवश्यक तेथे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण झाले आहे. परंतु पिंपळी व शिरगावच्या सीमेवर केवळ २५ फूट रस्त्यातील डांबरीकरण शिल्लक आहे. या ठिकाणी भलेमोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यात ते आणखी धोकादायक बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे या किरकोळ कामाविषयी ओरड केली जात असून, हे खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात येत आहे.
कुंभार्ली घाट आजच्या घडीला वाहतुकीसाठी सुरक्षित आहे. संपूर्ण घाटात वाहतुकीसाठी कुठेही अडचण येणार नाही. पावसाळ्यात आवश्यक ती खबरदारी घेतली जाणार आहे. त्यासाठी सुरक्षा रक्षकांसह अन्य यंत्रणा सज्ज ठेवली जाणार आहे. - उत्तम कुमार मुळ्ये, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम, चिपळूण