Maratha Reservation: रत्नागिरी जिल्ह्यात कुणबी मराठा नोंदी मिळाल्या, नेमक्या किती...जाणून घ्या
By शोभना कांबळे | Published: November 8, 2023 06:01 PM2023-11-08T18:01:04+5:302023-11-08T18:02:19+5:30
सध्या गाव नमूना १४ मधील जन्म - मृत्यूच्या नोंदीत नाव आणि जातींची तपासणी केली जात आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यातील ८ तालुक्यांमधील १३०४ तपासणी गावांच्या संख्येत काल, मंगळवार अखेर केलेल्या रजिस्टर तपासणीमध्ये ६९ कुणबी मराठा नोंदी मिळाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली आहे.
मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्याबाबत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर अधिक गती आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातून कुणबी मराठा नोंदी मागविण्यात आल्या आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा पातळीवर वेगाने काम सुरू झाले आहे. त्यासाठी महसूल अभिलेखातील नोंदी तपासल्या जात आहेत. सध्या गाव नमूना १४ मधील जन्म - मृत्यूच्या नोंदीत नाव आणि जातींची तपासणी केली जात आहे.
जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांची बैठक घेऊन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी याबाबत सुचना दिल्या आहेत. त्यानुसार तालुकास्तरावर हे काम जोरात सुरू आहे. आतापर्यंत ८ जिल्ह्यातील १३०४ गावांमधील महसूल अभिलेखांची तपासणी सुरू आहे. आतापर्यंत १३०४ गावांमधील सुमारे २० हजार पेक्षा अधिक नोंदी तपासण्यात आल्या आहेत. यात १९१० सालानंतरचे अभिलेख तपासले जात आहेत.
मंगळवारअखेर १३०४ गावांमधील महसुली अभिलेखात ६९ कुणबी मराठा नोंदी सापडल्या असल्याचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी सांगितले आहे.
राजापूर, चिपळूणमध्ये सर्वाधिक नोंदी
मंगळवारपर्यंत तपासलेल्या दस्तएेवजात सर्वाधिक राजापुरात सर्वाधिक कुणबी मराठा नोंदी २८ तर त्याखालोखाल चिपळूण तालुक्यात २२ नोंदी आहेत. मंडणगड ५, दापोली ८, खेड ५ आणि रत्नागिरीत १ अशा कुणबी मराठा नोंदी आढळल्या आहेत.