खेर्डी, खडपोली औद्योगिक वसाहतीत औरंगाबादच्या धर्तीवर कोविड केअर सेंटर उभारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:32 AM2021-05-08T04:32:38+5:302021-05-08T04:32:38+5:30
अडरे : चिपळूण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत आहे. येथील शासकीय रुग्णालय, खाजगी रुग्णालये, कोविड केअर सेंटर हाऊसफुल्ल ...
अडरे : चिपळूण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत आहे. येथील शासकीय रुग्णालय, खाजगी रुग्णालये, कोविड केअर सेंटर हाऊसफुल्ल होत आहेत. त्यातच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा धोका वेळीच ओळखून खेर्डी व खडपोली एमआयडीसीमध्ये कोविड केअर सेंटर उभारावे, अशी मागणी चिपळूण युवा सेनेचे तालुकाधिकारी उमेश खताते यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चिपळूण तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट घातक ठरत आहे. या लाटेत अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे
आरोग्य सुविधा मिळत असल्या तरी त्या अपुऱ्या पडत आहेत. गेले काही दिवस रुग्णसंख्या स्थिर होत असून, मृत्यूचे प्रमाणदेखील कमी होत आहे. मात्र तिसरी लाट आली तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. चिपळूण तालुक्यात खेर्डी आणि खडपोली येथे दोन औद्योगिक वसाहती आहेत. या ठिकाणी सुदैवाने पुरेशी जागा आणि प्रशस्त अशा रिकाम्या इमारतीही आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत औरंगाबादच्या धर्तीवर येथे एमआयडीसीकडून २०० ते ३०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करावे. जेणेकरून येथील कामगारांना व त्यांच्या नातेवाइकांना आणि आजूबाजूच्या लोकांना उपचार उपलब्ध होतील. त्यासाठी लागणारे अन्य सहकार्य चिपळूण तालुका युवा करेल, असे खताते यांनी निवेदनात म्हटले आहे.