कमी पटसंख्येमुळे रत्नागिरीतील १८८ शाळांना लागणार कुलुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 05:44 PM2017-12-08T17:44:43+5:302017-12-08T17:48:02+5:30
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ० ते १० पटसंख्येच्या १८८ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करावे, असा आदेश शासनाने दिला आहे. या विषयावर झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत जोरदार चर्चा झाली़
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ० ते १० पटसंख्येच्या १८८ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करावे, असा आदेश शासनाने दिला आहे. या विषयावर झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत जोरदार चर्चा झाली़
सभापती नागले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली़ या सभेत जिल्ह्यातील विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा झाली़ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
या पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी विविध उपक्रम राबविले होते़ हे उपक्रम शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांच्या फायद्याचे ठरणारे आहेत़ त्यासाठी पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी राबविलेले उपक्रम जिल्हा परिषदेच्या २७०० प्राथमिक शाळांमध्ये राबवण्याबाबत चर्चा झाली़ यामध्ये हे उपक्रम राबविण्याचा एकमुखी निर्णय या सभेत घेण्यात आला़
लवकरच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत़ या स्पर्धांमध्ये प्रत्येक स्तरावर खेळाडूंचा संघ निवड करण्यात येणार आहे़ त्यामुळे हरलेल्या संघातील चांगल्या खेळाडूंना यामध्ये संधी देण्यात येणार आहे.
यामध्ये केंद्र, बीट, तालुकास्तर, जिल्हास्तरावर संघाची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हावर निवड करण्यात आलेला संघ राज्यस्तरावर खेळवण्यात येणार आहे, अशा प्रकारे चांगल्या खेळाडूंची निवड करण्याचा निर्णय प्रथम घेण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला़
ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात घट होत आहे़ त्यामुळे या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या १८८ प्राथमिक शाळांची पटसंख्या ० ते १० आहे.
या शाळांमधील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ या निर्णयावर आजच्या शिक्षण समितीच्या सभेत जोरदार चर्चा झाली़
नाईलाजास्तव शासन निर्णयाची अंमलबजावणीे जिल्हा परिषदेला करावी लागणार आहे. त्यामुळे या १८८ शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्या शाळेत करण्यात येणार असल्याने या शाळा बंद होणार आहेत.
जिल्हा परिषद शाळांच्या मागे कमी पटसंख्येचे असलेले शुक्लकाष्ट संपता संपेना; घटत्या पटसंख्येमुळे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांतील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्याची वेळ आली आहे.
समायोजन करताना नजीकच्या शाळेतच करण्यात यावे, अशी मागणी आता जिल्ह्यातील पालकांकडून होत आहे. मात्र, दुसरीकडे शाळांच्या घटत्या पटसंख्येला जबाबदार कोण? असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे.