रत्नागिरीत पर्यटनासाठी आवश्यक असलेले इन्फ्रास्ट्रक्चर कमी, पर्यटन मंत्र्यांनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 11:43 AM2023-05-29T11:43:55+5:302023-05-29T11:44:24+5:30
एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
रत्नागिरी : जिल्ह्यात जोपर्यंत वीज, रस्ते, सुरक्षेची व्यवस्था केली जात नाही, तोपर्यंत पर्यटनाच्या ठिकाणी पर्यटक जात नाहीत. जिल्ह्यात पर्यटनासाठी आवश्यक असलेले इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे, अशी खंत राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार उद्योजकता व नावीन्यता, महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताहाची रविवारी (२८ मे) सांगता करण्यात आली. जागरण सप्ताहाच्या सांगता समारंभासाठी मंत्री लाेढा रत्नागिरीत आले आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, केदार साठे उपस्थित हाेते. जिल्ह्यात एखादे पर्यटन स्थळ किंवा मंदिर विकसित केल्यास तेथे जाण्यासाठी रस्ताच नसेल तर कोण जाणार, असा प्रश्नही मंत्री लाेढा यांनी उपस्थित केला. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे विकसित झालीच पाहिजेत. शिवाय त्यांचे सुशोभीकरणही आवश्यक आहे. पर्यटनाबाबत अनेक प्रश्न आहेत. ते आपण एका वर्षात सोडवू शकत नाही. मात्र, ते सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.
प्रत्येक जिल्ह्यात पर्यटन विकासासाठी टूर एजंट, ट्रॅव्हल्स एजंट, पर्यटनातील तज्ज्ञ मंडळी अशा २० जणांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच येत्या सहा महिन्यांत पर्यटन विकास मंडळातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यटनाबाबतच्या अनेक बाबी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी लक्षात आणून दिल्या. त्याबाबत योग्य मार्ग काढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
जिल्ह्यात एमटीडीसीच्या नऊ जागा आहेत. त्यामध्ये तीन जागांचा भाडेकरार संपला तरीही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. अधिकाऱ्यांची चूक झाली असून, ही चूक का झाली याबाबत कल्पना नसल्याचे मंत्री लाेढा म्हणाले. जिल्हाधिकारी याकडे आता लक्ष देत असल्याचे त्यांनी सांगितले. एमटीडीसीचे रिसॉर्ट येत्या वर्षभरात विकसित करणार असून, जिल्ह्यात ‘टँकसिटी’ तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
औद्याेगिक प्रशिक्षण संस्थांचे नूतनीकरण
जिल्ह्यात नऊ औद्याेगिक प्रशिक्षण संस्था आहेत. त्यांचे नूतनीकरण करण्यात येणार असून, त्याबाबतचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच अंगणवाड्यांसाठी इमारती कमी आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या रिकाम्या इमारती अंगणवाड्यांना देण्यात याव्यात, अशी विनंती जिल्हाधिकारी यांनी केल्याचे पर्यटन मंत्री लोढा यांनी सांगितले. त्यावर विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.