लसचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:34 AM2021-04-28T04:34:16+5:302021-04-28T04:34:16+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी सध्या जिल्ह्यासाठी येणारा साठा अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे आता ...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी सध्या जिल्ह्यासाठी येणारा साठा अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे आता लसीकरणाच्या मोहिमेला खीळ बसली आहे. शासनाने आता सरसकट ४५ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करण्याचे आदेश दिले असले तरी त्या तुलनेने लसीचा साठा अपुरा पडत असल्याने आता लसीकरण मोहिमेतही खंड पडत आहे.
आरोग्य यंत्रणेची धावपळ
रत्नागिरी : जिल्ह्यातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून राबत असलेल्या आरोग्य यंत्रणेवर अधिकच ताण येत आहे. या यंत्रणेकडे मनुष्यबळही अपुरे आहे. त्यामुळे या रुग्णांना सेवा देताना यंत्रणेच्या नाकीनऊ आले आहेत. कर्मचाऱ्यांना दोन दाेन पाळ्यांमध्येही अविरत सेवा द्यावी लागत आहे.
मोकाट श्वान वाढले
रत्नागिरी : जिल्हाभरात कोरोनाच्या अनुषंगाने लाॅकडाऊन सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिक आणि वाहने दोन्हींची वर्दळ थांबली आहे. रात्री ८ वाजल्यानंतर तर रस्त्यावर सामसूम असते. मात्र, रस्त्यावर शुकशुकाट असला तरी मोकाट श्वान झुंडीने वावरत असतात. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांनी या श्वानांचा चांगलाच धसका घेतला आहे.
रस्तादुरुस्तीचा त्रास
रत्नागिरी : शहरातील अनेक भागातील रस्ते सध्या खोदलेले आहेत. काही रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठे चर खणून ठेवले आहेत. रात्रीच्या वेळी हे चर लक्षात येत नाहीत. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना अडचणीचे होत आहे. विशेषत: दुचाकीस्वारांना हे चर दिसत नसल्याने बरेचदा दुचाकी घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
ग्रामकृती दलाची ओढाताण
देवरूख : सध्या जिल्हा प्रशासनाने ग्राम कृती दलांना सक्रिय होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कृती दलाचे कार्यकर्ते आता कामाला लागले आहेत. गावांमध्ये कुणी आजारी असेल किंवा कुणी बाहेरून आलेला असल्यास ही सर्व माहिती या कृती दलाला संकलित करावी लागत आहे. ग्राम कृती दलांना अधिक सतर्क राहावे लागत आहे.
व्यावसायिकांचे नुकसान
चिपळूण : सध्या लाॅकडाऊन सुरू असल्याने व्यायामशाळा, जिम, केश कर्तनालये, ब्युटी पार्लर बंद आहेत. त्यामुळे या छोट्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे आता लाॅकडाऊन होईपर्यंत या व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागत असल्याने त्यांच्यामधून चिंता व्यक्त होत आहे.
हाॅटेलना फटका
दापोली : येथील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. त्याचबरोबर लाॅकडाऊन काळात घरपोच सेवा आणि पार्सल वगळता हाॅटेल्स, रेस्टाॅरंट यांनाही सुरू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षभर या व्यवसायाला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. त्यातच आता पुन्हा लाॅकडाऊन झाल्याने या व्यवसायाला माेठा आर्थिक फटका बसला आहे. खर्च कसा भागवायचा, ही चिंता सतावत आहे.
गाळ उपसा सुरू
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपानजीक असलेल्या देवडे गावातील काजळी नदी गाळ उपसा प्रकल्पाला सुरुवात झाली आहे. हे काम नाम फाउंडेशनने दिलेल्या पोकलँड यंत्राद्वारे सुरू करण्यात आले आहे. हे पात्र गाळमुक्त झाल्यास या गावाला पाण्याचा मुबलक पुरवठा होणार आहे. पावसाळ्यापूर्वी गाळ उपसा होण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
कडक लाॅकडाऊन
रत्नागिरी : सध्या लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. पोलीस यंत्रणेने सकाळी ११ वाजल्यानंतर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून रात्रीही आठ वाजल्यानंतर ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची पोलिसांकडून कसोशीने तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर विनाकरण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे.
खेळाची मैदाने ओस
रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने सर्वत्र लाॅकडाऊन केले आहे. त्याची कडक अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणेही बंद आहेत. सुट्टीच्या कालावधीत मोकळ्या मैदानांवर सुरू असलेल्या खेळांवरही मर्यादा आली आहे. त्यामुळे मोकळी मैदानेही आता ओस पडलेली दिसत आहेत.