लांजात पाणीटंचाई आणखी तीव्र होणार
By admin | Published: May 2, 2016 11:15 PM2016-05-02T23:15:23+5:302016-05-03T00:51:26+5:30
काळ्या ढगांकडे डोळे : केवळ एक टँकर आणखी किती लोकांची तहान भागवणार-- दुष्काळ दाह
अनिल कासारे-- लांजा -कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे तालुक्यातील नद्या, विहिरी, तलाव यांच्या पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. जिल्ह्यात प्रथमच चिंचुर्टी येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. सध्या ३ गावे ४ वाड्यांमध्ये पाण्याची झळ पोहोचली आहे, तर काही दिवसात ७ गावे १७ वाड्यांमध्ये पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. एकच टँकर सध्या पाणीपुरवठा करत आहे.
तालुक्यातील पूर्व भागातील वस्त्यांमध्ये दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. मात्र, या वाडी-वस्त्यांना मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून टंचाईला सुरुवात होते. पाऊस पडेपर्यंत येथे पाणीपुरवठा करावा लागतो. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने चिंचुर्टी - धावडेवाडी येथे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाणीटंचाईची झळ पोहोचली आणि जिल्ह्यात पहिला टँकर धावला.
सध्या पालू - चिंचुर्टी - धावडेवाडी येथे एकूण ४८ घरे असून, १५८ लोकवस्ती आहे. या घरांना दिनांक १७ मार्चपासून दररोज पालू हुंबरवणे - १०८ लोकवस्ती ४७ घरे, दिनांक ६ एप्रिलपासून एक दिवसाआड करून, कोचरी - भोजवाडी १२३ लोकवस्ती, ३५ घरे, दिनांक २२ मार्चपासून एक दिवसाआड, गोळवशी - खांबडवाडी २७२ लोकवस्ती, ६२ घरे यांना दिनांक २ एप्रिलपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. एकूण ६६१ लोकवस्ती असलेल्या १८२ घरांना सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे.
मार्च महिन्यापासून लांजा तालुक्यातील ३ गावे ४ वाड्या पाण्यासाठी वणवण करत असताना प्रशासनाकडून पाणीपुरवठा करणारा ५ हजार लीटरचा टँकर पाठवला जात आहे. चिंचुर्टीमध्ये दररोज, तर इतर ३ वाड्यांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे दिवसेंदिवस पाण्याच्या पातळीमध्ये घट होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट ओळखून विवली - राईधनगरवाडी, गवाणे - रामाणेवाडी, कणगवली - शिंदेवाडी, पालू - नामेवाडी, पानली खालचीवाडी, वीसघर कमिटी, रामवाडी, दंडावरची वाडी, खाकेवाडी, गावकरवाडी, बौद्धवाडी, कोचरी - बेंंद्रेवाडी, बौद्धवाडी, सुतारवाडी, डाफळेवाडी, धनगरवाडी, वाडगाव - हसोळ - कोंडवाडी एकूण ७ गावे १७ वाड्यांना मे महिन्यात पाणीटंचाई भीषण होणार असल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडे मागणीचे पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे पुढे १० गावे २१ वाड्यांना पाणीपुरवठा करावा लागणार आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे गावांच्या संख्येत मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या ३ गावे ४ वाड्यांमध्येच पाणीटंचाईचे संकट आहे. मात्र, ७ गावे १७ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी मागणीचे पत्र दिले आहे. त्याचप्रमाणे भविष्यात अधिक गावे व वाड्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या एका टँकरने ३ गावांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करत आहे. मात्र, मे महिन्यामध्ये पाणीटंचाई भासणाऱ्या गावांमध्ये वाढ होणार असल्याने एक टँकर एवढ्या गावामध्ये पाणीपुरवठा करणे अवघड होऊन बसणार आहे. त्यासाठी प्रशासनाने पाणीटंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने अजून दोन टँकरची व्यवस्था करून पाणीटंचाईचे संकट दूर करावे, अशी अशी मागणी करण्यात येत आहे. सध्या नद्या, विहिरी, तलावांच्या पाणी पातळीमध्ये घट होत असल्याने संपूर्ण मे महिना शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट कसे निपटावे, हीच चिंता लोकांना लागून राहिली आहे.