लाेकमंच - पिरसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:11 AM2021-08-02T04:11:56+5:302021-08-02T04:11:56+5:30

‘पिरसा’ हा शब्द कोकणातल्या बऱ्याच जुन्या जाणत्या लोकांना माहीत असेल. पिरसा म्हणजे पावसाळ्यात शेतीचे कपडे आणि विशेषत: घोंगडी सुकवण्यासाठी ...

Laekmanch - Pirsa | लाेकमंच - पिरसा

लाेकमंच - पिरसा

Next

‘पिरसा’ हा शब्द कोकणातल्या बऱ्याच जुन्या जाणत्या लोकांना माहीत असेल. पिरसा म्हणजे पावसाळ्यात शेतीचे कपडे आणि विशेषत: घोंगडी सुकवण्यासाठी तयार केलेली लाकडाची व बांबूची चौकट ज्याला ‘दांडी’ किंवा ‘साठी’ म्हणत. त्याच्याखाली आग पेटवली जायची. पिरसा हा एका भिंतीलगत पेटवला जायचा. जुन्या मातीच्या भिंतींना खुंट्या असायच्या त्या खुंट्यांना ही लाकडाची चौकट दोरीच्या सहाय्याने एका ठराविक अंतरावर अडकवली जात असे. दांडीच्या खाली लाकडं रचून आग पेटवली जात असे. भिंतीला नुकसान पोहचू नये म्हणून एक पाट्यासारखा दगड भिंतीसमोर उभा करून या दगडाच्या पुढ्यात लाकडं पेटवली जातं असत. या सगळ्याची सांगड म्हणजे पिरसा.

आजच्या काळात पिरसा असलेलं घर सापडणं तसं कठीणच. पण, पिरशासोबतच्या आठवणी आजही मनात घर करून आहेत. आमच्या गावी आमचा पिरसा आजोबानी बांधलेल्या नव्या घरात होता. या घराला बांधून जवळपास पन्नास वर्षे होऊन गेली होती. तरीही त्या घराला नवीन घर म्हणूनच बोललं जायचं. हे घर पूर्णपणे चारही बाजूने मोकळं होत. चार बाजूनी चार पडव्या व मधे एक ओटी. या ओटीला तीन बाजूने भिंती होत्या व समोरून मोकळी जागा. याच ओटीवर पिरसा पेटवला जायचा.

सायंकाळी लावणीची मळी लावून झाली की, जोतया तसेच बांधक्या, कोनक्या म्हणजेच आमच्याकडे कामाला असणारे भानू मामा, शिरी मामा व शिरीमामाची बायको सुनीता मामी सगळे या पिरशावर ऊब घ्यायला बसायचे. पाणचुलीवर तपेल्यात पाणी तापेपर्यंत सगळे आपली थंडी घालवण्यासाठी पिरशाच्या बाजूला बसायचे. पिरशाखालची धगधगणारी आग या सगळ्यांना उबेचा आधार द्यायची. पिरशावर पाठ, कंबर शेकवली, की त्रास कमी व्हायचा. ही आग दिवसभर पावसात गारठलेलं शरीर उबदार करायची आणि दमलेल्या शरीराचा थकवा घालवायची.

रात्री आंघोळ करून झाली की सगळे पुन्हा या पिरशाजवळ यायचे. घोंगडी बांबूच्या दांडीवर सुकायला घातली जायची. ताई, आण्णा (आजी, आजोबा) मी, संजूकाका सोबत भानू आणि शिरी मामा असायचे. सगळे एकत्र आले मग सुरू व्हायच्या गप्पा. दिवसभरात घडलेल्या गमतीजमती आम्हाला पिरशाजवळ कळायच्या. आज किती मळ्या लावून झाल्या. कुठच्या मळीत तास कमी झाले. चिखल कशी झाली. म्होऱ्या सर्जाला कसा भारी पडला. किती दाड काढून झाली. कुठच्या मळीला पाणी कमी पडलं. यांसारख्या गप्पांचा पिरसा साक्षीदार असायचा. उद्या किती मळ्या लावून होतील, याचा अंदाज बांधला जायचा. बोलता बोलता मधेच भानू मामा पिरशात हळूवार लाकूड लावायचे. कारण एका लयीत धगधगणाऱ्या आगीच्या ज्वालांची लय कमी होऊ नये, हा एकच उद्देश असायचा.

आम्हाला या पिरशाजवळ बसायला खूप मजा यायची. कारण गप्पा मारता मारता काजू आणि फणसाच्या सुकवलेल्या आटला आजी भाजून सगळ्यांना द्यायची. त्या पिरशावर भाजून खाल्लेल्या काजू आणि आटलांची चव न्यारीच होती. बाहेर धोधो पाऊस पडत असायचा. कौलावर पावसाचं एक वेगळचं संगीत सुरू असायचं आणि गप्पांचे फड रंगात आलेले असतानाच गरम गरम पिटलं भाकरीची ताटं पुढ्यात यायची. कधी कधी रोवनाची भाजी असायची, तर कधी रानभाज्यांची भाजी. सगळे मनसोक्त ताव मारायचे.

पावसाळ्यात पिरसा आणि आमचं नातं घट्ट असायचं. आजोबानी सांगितलेल्या कितीतरी गोष्टी आम्ही या पिरशासोबत ऐकलेल्या आहेत. एक मैफलचं रंगायची त्या काळी, जसजशी रात्र वाढत जायची तशी पिरशाची धगधग कमी होत जायची. लालभडक निखारे काळोखाला रंग भरायचे. सगळे उद्या लवकर उठायचं म्हणून झोपून जायचे. जागा असायचा तो फक्त पिरसा. आपल्या मालकाची घोंगडी सुकवायची जबाबदारी खांद्यावर घेतलेला.

टीप-

जोतया- बैलांचे जोत धरणारी व्यक्ती

बांधक्या- बांधावर चिखल घालणारा व्यक्ती

कोनक्या- मळीचा कोपरा खोदणारा व्यक्ती

पाणचूल- गावी बाहेरच्या पडवीत पाणी गरम करण्यासाठी बांधलेली चूल

रोवनं- पावसाळ्यात येणारी अळंबीची भाजी

सर्जा व मोऱ्या - बैलांची नावे

- विराज वि. चव्हाण, वाटूळ, ता. राजापूर

Web Title: Laekmanch - Pirsa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.