लाेकमंच : काेराेना हटाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:23 AM2021-05-29T04:23:57+5:302021-05-29T04:23:57+5:30

दोन-तीनच तास व दोन-तीनच दुकाने समजा सुरु असतील, तर तिकडे झुंबड उडणारच. तेव्हा ‘गर्दी’ होऊ न देणे हा विषय ...

Laekmanch: Remove Kareena | लाेकमंच : काेराेना हटाव

लाेकमंच : काेराेना हटाव

Next

दोन-तीनच तास व दोन-तीनच दुकाने समजा सुरु असतील, तर तिकडे झुंबड उडणारच. तेव्हा ‘गर्दी’ होऊ न देणे हा विषय महत्त्वाचा मानावा. व्यापारच बंद हा विषय असू नये. लॉकडाऊनला पर्याय आहेत, पण लक्षात कोण घेतो? पोलिसांवर सगळा भार, ताण देण्यापेक्षा वचक्या युवकांची स्कॉड्स नेमणे ही काळाची गरज आहे. हजार - पाचशे इतका मामुली दंड न करता, दंड थोपटून ‘स्कॉड्स’ना उभे राहावे लागेल. रोज लाखो रुपयांचा दंड जमा झाल्यास, त्यातून स्कॉड्सचा पगार देता येईल. हा विषय ‘प्रमाणपत्रांचा’ नसून मानधनाचा आहे. अर्थात टाळेबंदी अपरिहार्य वाटत असेल तरची ही बात!

धार्मिक श्रद्धा हा प्रत्येकाचा घटनादत्त हक्क आहे, पण देश वाचवताना त्याचा सार्वजनिक अविष्कार, सामुदायिक उत्सव पुढील दोन वर्षे तरी करता येणार नाही. त्यात मोठी जोखीम आहे. कुंभमेळ्याचे उदाहरण ताजे आहे.

कोरोनाची जेव्हा लाट येते तेव्हा मोबाईलवर सार्वजनिक ठिकाणी बोलायची पूर्ण बंदी हवी. फोनवर बोलण्यासाठी मास्क नाका-तोंडावरुन खाली सरकवला जातो, हे आपण रोजच पाहतो. लोक फोनवर महत्त्वाचे काही बोलत नसतात, हा विषय बाजूला ठेवू. मुळात त्यांनी मास्क हटविणेच कोरोनाचा जोर असताना चुकीचे आहे.

कोरोना प्रभाव खरोखरच कमी करायचा असेल तर अलिप्त जीवनाची पद्धतशीरपणे सवय करुन घ्यावी लागेल व पारंपरिक रितभात, कर्मकांड यांना नकार द्यावा लागेल. जोपर्यंत पारंपरिक जीवनाचे प्रस्थ आहे, तोपर्यंत कोरोना जाणार नाही. प्रतिगामी महाराष्ट्र विचारवंतांनाच गोळ्या घालून खतम करतो. मग कसे होणार? विचार मांडणाऱ्यांना जे दहशत - दडपणाखाली जगावे लागते, त्याविरोधात सरकारने काय केले? काही नाही! तेव्हा मार्गदर्शकांना अभय द्यावे लागेल.

ही लढाई, कोरोनाचे चीनने लादलेले हे जागतिक युद्ध जिंकताना केवळ ‘इंडिया’चा ‘ऑनलाईन’ विचार झाला. ‘भारताचा’ ‘ऑफलाईन’ विचार केला, तर ही लढाई लवकर जिंकता येईल. लसीकरण ऑफलाईन होणे ही आजची, उद्याची गरज नाही.

कोरोनाला दूर पळवताना मतांचे राजकारण व लोकांना खुश ठेवण्याची वृत्ती वारंवार आड येणार आहे. तिसरी लाट वेगाने पसरु लागल्यास लष्कराची मदत घेण्यास शासनाने विलंब करु नये. लष्कर कुणालाही ओळखत नाही. त्यामुळे ‘भेदभाव’ होणार नाही.

दैववादी मानसिकता पराभूत व नकारवादी असते. त्याऐवजी मानवकेंद्रीत प्रयत्नवाद वाढवावा लागेल. कोकणातील लेखकांकडून वैचारिक अपेक्षा नाहीत, पण पत्रकारांकडून आहेत. जर पुढारलेल्या काळाशी सुसंगत विचारांना स्पेसच मिळाली नाही, तर प्रबोधन प्रक्रिया बंद पडेल व त्यातून अनर्थ वाढत जाईल, यात शंका नाही.

समाजमाध्यमांवरील धुमाकूळ थांबवण्यातही या देशातील व्यवस्था यशस्वी झाली नाही. गोंधळाचे वातावरण, संभ्रम निर्माण करणे हा देशद्रोह का मानू नये? असा मुद्दा आहे. प्रत्येक गोष्ट फार गोड, मऊ पद्धतीने घेतली जात आहे. सगळ्यांची मने राखून, सांभाळून महायुद्ध जिंकता येईल, असे कुणाला वाटत असेल, तर तोही भ्रमच ठरणार आहे!

- माधव गवाणकर, दापोली

Web Title: Laekmanch: Remove Kareena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.