कधी बस स्टँडवर राहिली, कधी उपाशीही झोपली; गवंडी काम करणाऱ्या आईची लेक सिक्रेट इन्फॉर्मेशन ऑफिसर झाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:37 AM2021-08-18T04:37:23+5:302021-08-18T10:21:24+5:30

शिरगाव : आई गवंडी कामात मदत करून घर चालवते. आईच्या कष्टाची जाणीव असलेल्या तिच्या लेकीने मात्र तिचे पांग फेडले. ...

Inspirational Story: a girl from very poor family becomes secret information officer | कधी बस स्टँडवर राहिली, कधी उपाशीही झोपली; गवंडी काम करणाऱ्या आईची लेक सिक्रेट इन्फॉर्मेशन ऑफिसर झाली!

कधी बस स्टँडवर राहिली, कधी उपाशीही झोपली; गवंडी काम करणाऱ्या आईची लेक सिक्रेट इन्फॉर्मेशन ऑफिसर झाली!

Next

शिरगाव : आई गवंडी कामात मदत करून घर चालवते. आईच्या कष्टाची जाणीव असलेल्या तिच्या लेकीने मात्र तिचे पांग फेडले. बसस्थानकावर राहून, कधी उपाशी, तर कधी दोनच घास खाऊन आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि वयाच्या २२ वर्षी ही लेक स्पर्धा परीक्षेतून सिक्रेट इन्फॉर्मेशन ऑफिसर झाली. परिस्थिती प्रतिकूल आहे म्हणून हातपाय गाळून न बसता, त्या परिस्थितीशी झगडलेल्या आणि यश मिळवलेल्या या लेकीचं नाव आहे प्राजक्ता कदम.

चिपळूण तालुक्यातील गाणे गावातील प्राजक्ता कदम हिने वयाच्या २२ व्या वर्षीच स्पर्धा परीक्षेत धवल यश संपादन करून रत्नागिरी जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थ्यांसमोर जिद्द आणि चिकाटी कशी असते, याचा आदर्श घालून दिला आहे. सिक्रेट इन्फॉर्मेशन ऑफिसर या पदासाठीच्या सात वर्षांनंतर निघालेल्या भरती प्रक्रियेत तीन जिल्ह्यांतून प्रथम क्रमांक मिळवत तिने हे यश मिळवले आहे. लवकरच पुणे येथे आपण पदभार स्वीकारणार असल्याची माहिती गाणे ग्रामपंचायतीने केलेल्या सत्काराला उत्तर देताना दिली.

परीक्षेतील या यशाबद्दल ग्रामपंचायतीच्यावतीने तिचा सत्कार करण्यात आला. त्याला उत्तर देताना तिने आपला प्रवास मांडला. प्राथमिक शिक्षण तिने गाणे गावात घेतले. त्यानंतर १२ वीपर्यंत सती येथील सायन्स महाविद्यालयात ती शिकत होती. स्थापत्य पदवी शिक्षण घेत असतानाच तिने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात झोकून दिले. भारतीय संविधान या विषयावर सखोल अभ्यास करत तो विषय केंद्रबिंदू ठरलेल्या परीक्षेत निवड प्रक्रियेतील चारही टप्पे पार केले. विशेष म्हणजे तिची आई आजही गवंडी कामात मदत करून आपला उदरनिर्वाह चालवत आहे. ती ज्या परीक्षा देत होती, त्याबद्दल तिच्या आईला कसलीच कल्पना नव्हती. आई फक्त लागतील ते पैसे आपल्या क्षमतेनुसार पुरवत राहिली. आईच्या कष्टांची जाणीव असलेली प्राजक्ताही अनेकदा आपली भूक मारून अभ्यास करत राहिली.

कर्नाटक सरकारकडून होणाऱ्या परीक्षेचा शेवटचा पेपर कोरोनामुळे रत्नागिरी जिल्ह्यात घ्यावा, अशी ७० परीक्षार्थींच्या मागणीमध्ये ती होती. वय आणि उंची दोन्ही कमी दिसणारी, मात्र बोलायला चुणचुणीत प्राजक्ता रत्नागिरीत होस्टेलला वेळेचे बंधन पाळू शकत नव्हती की खोली भाडे देऊ शकत नव्हती. रात्री-अपरात्री एकाकी वावरताना अनेकांनी वेडे फिरतात, तू कशी सामना करशील, अशी भीती घातली. पण ती डगमगली नाही. कुठेच राहायची सोय नाही, तर ती रत्नागिरी बसस्थानकावर बसून रात्र घालवत राहिली. पण या गोष्टी घरी बोलली नाही. रत्नागिरी आगारातील बाथरूमच्या कोपऱ्यावरच्या तिच्या दोन वर्षे राखीव जागेची चर्चा आजही होते. तेथील संवेदनशील कर्मचारी सातपुते यांनी आपल्या डब्यातील घास मला दिल्याचे तिने यावेळी आवर्जून सांगितले. डबा पर्याय नसल्याने कुरकुरे खाऊन तिने रात्र काढली, पण आपले ध्येय गाठले.

देशाला ऑलिम्पिक पदक मिळाले त्यापेक्षा अधिक आनंद प्राजक्ताची बातमी ऐकून ग्रामस्थांना झाल्याचे सरपंच निवृत्ती गजमल यांनी नमूद केले. त्या कुटुंबाने जे कष्ट घेतले, त्याचा आम्ही ग्रामस्थ आदर करतो आणि प्रत्येकाची मान तिच्यामुळे उंचावली, अशा भावना व्यक्त करत आनंद व्यक्त केला.

Web Title: Inspirational Story: a girl from very poor family becomes secret information officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.